
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सरकारने एकूण ३१० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, अपूर्ण नळ योजनांसाठी ४८८ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २० नोव्हेंबर : राज्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आतापर्यंत एकूण ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विक्रमगड, वाडा, दिंडोरी आणि चिपळूण या तालुक्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यांचा दुष्काळी यादीत नव्याने समावेश करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच आणखी १३ तालुक्यांच्या प्रस्तावांबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नळ योजनांसाठी ४८८ कोटी व शेतकऱ्यांना दिलासा
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अपूर्ण अवस्थेतील नळ पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याकरिता ४८८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय थकीत वीज बिलामुळे बंद पडलेल्या योजनांची केवळ चालू बिल घेऊन वीज जोडणी पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्स कंपन्या किंवा बँकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, असे स्पष्ट आदेश शासनाने दिले असून त्रास झाल्यास शेतकऱ्यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जलसंधारणासाठी ५ हजार कोटींची नवी योजना
भूजल पातळी वाढवण्यासाठी राज्यातील जुने आणि मृत बंधारे, मालगुजारी तलाव व शिवकालीन बंधारे दुरुस्त करून पुढील तीन वर्षांत १५ हजार गावे जलसमृद्ध करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी डिसेंबरच्या अर्थसंकल्पात सुमारे पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणाच्या तातडीच्या उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या आर्थिक खर्चाच्या मर्यादेतही मोठी वाढ करण्यात आली आहे.





