दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२३ | फलटण |
राज्यातील नगरपालिका, महानगरपालिकांसह शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये कार्यरत असणारे सफाई कामगार ९ ऑगस्ट रोजी एकदिवसीय ‘काम बंद’ आंदोलन करणार आहेत. याबाबतचे पत्र अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार फलटण नगर परिषदेतीलही सफाई कामगार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन फलटण शहर येथील अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकार्यांना देण्यात आले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका, महानगर पालिकांसह शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असणारे सफाई कामगार व मेहतर वाल्मिकी समाजाचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी व दि. २४ फेब्रुवारी २०२३ रोजीचे निर्गमित शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यासाठी बुधवार, दि. ७ जून २०२३ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनावेळी ना. दादाजी भुसे यांनी जी आश्वासने दिली होती, त्यांची अद्याप पूर्तता न झाल्यामुळे ९ ऑगस्ट २०२३ रोजी ‘क्रांतिदिनी’ राज्यातील सर्व नगर परिषद, महानगर पालिकांमध्ये कार्यरत सर्व सफाई कामगार एकदिवसीय ‘काम बंद’ आंदोलन करणार आहेत.