वारीच्या वाटेवर – आनंद कंदाचे मोहळ.. ‘वारकरी सांप्रदाय’


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । फलटण ।  मनुष्यजीवन सर्वांगसुंदर व्हावे, त्या जीवनातील दुःख आणि यातनांचे विष बाजूला सारुन ते अमृतासारखे मधुर व्हावे. याच ध्यासातून महाराष्ट्रीय संतांनी ‘वारकरी सांप्रदाय’ ही भक्तिमय उपासना पध्दती भूलोकी प्रगट केली. भगवान श्रीकृष्ण तथा पंढरीश परमात्मा श्री.विठ्ठल हे त्यांनी वारकरी सांप्रदायाचे दैवत मानले.

कोणतेही दैवत हे ईश्वरी रुप तथा ईश्वरच असते असे आपण मानतो. मात्र ईश्वर तर निर्गुण निराकार आहे. अध्यात्मतत्त्व असे सांगते की, सत, चित, आनंद हे ईश्वराचे स्वरुप आहे. ते दृष्टीला दिसत नाही, अनुभवायचे असते कारण ते निर्गुण आहे. पण गोकुळात रमलेला, व्दारका निर्मिलेला आणि पंढरपूरात कटेवर हात ठेवून स्थिरावलेला भगवंत हे त्या ईश्वराचे सगुण साकार रुप आहे असे वारकरी संप्रदाय मानतो. सत, चित, आनंद या तिन्ही गुणांनी युक्त, परिपूर्ण असलेले भगवान श्रीकृष्णाचे स्वरुप आहे. वारकरी सांप्रदायाने तोच श्रीकृष्ण तथा श्री.विठ्ठल सगुण रुपात आपले दैवत म्हणून सिध्द केला. या बाबत श्री. ज्ञानेश्वरांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचे विवेचन आपण मागील लेखात विस्ताराने पाहिले आहे.

‘तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुम:’

आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक अशा तिन्ही तापांचे निवारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला आम्ही वंदन करतो अशी ग्वाही या श्लोकाव्दारे श्रुतींनी व पुराणांनी दिली आहे. म्हणजेच वारकरी सांप्रदायाचे दैवत हे मनुष्याला सतावणाऱ्या सर्व प्रकारच्या व्याधींचा-तापांचा नाश करण्यास समर्थ आहे. सांप्रदायाने त्याच श्रीकृष्णस्वरुप श्री. विठ्ठलाला आपले आराध्य मानले आहे. हा सामर्थ्यशाली भगवान ‘प्रेम, वात्सल्य आणि आनंदा’चे प्रतीक आहे असा वारकरी संप्रदायाचा सिध्दांत आहे.

‘आता विश्वात्मके देवे’ असे निरुपण करताना वारकरी सांप्रदाय संपूर्ण विश्व म्हणजे ईश्वर आहे असे मानतो. ही चराचर सृष्टी ईश्वराचे रुप मानली तर त्यामध्ये निश्चितच सत, चित, आनंद भरलेला असणार ! कारण या तिन्हींचा परिपूर्ण मिलाप म्हणजे ईश्वर. त्यातील भूमिका मांडताना संत म्हणतात… ‘हे सर्व विश्व म्हणजेच ईश्वर आहे. या विश्वात सत, चित, आनंद परिपूर्ण भरलेला आहे. आपल्याला केवळ त्याला जागृत करायचे आहे. विश्वातील हा ईश्वरी अंश जागृत झाला की सर्वत्र एकच एक आनंद कल्होळ निर्माण होईल. तेणे सर्व सजीवसृष्टी सुखी, समाधानी होईल.’

आनंद निर्माण होण्यासाठी प्रत्येकाच्या हृदयात प्रेम आणि वात्सल्याची पेरणी व्हायला हवी. अंतःकरणात प्रेमाचा पाझर फुटला की वात्सल्याचा पान्हा प्रसवेल आणि मग आपोआप आनंदाची निर्मिती होईल. ‘पाया पडती जण एकमेकां’ असे संत तुकोबाराय सांगतात तेंव्हा त्याचा अर्थ हाच आहे की, प्रत्येकाने प्रत्येकाच्या अंतःकरणातील ईश्वरी तत्वाला वंदन करायचे आहे. एकदा का प्रत्येकातील ईश्वरी अंश मान्य झाला की, सारे विश्वच ईश्वर होऊन जाते. या ईश्वराची पूजा – आराधना म्हणजेच प्रत्येकाने एकमेकांची केलेली पूजा होय. सगळेजण जेंव्हा अशी पूजा करतील तेंव्हा भेद, व्देष, स्वार्थ नाहीसा होऊन सर्वांना सुख आणि समाधान प्राप्त होईल. वारकरी सांप्रदायाने यासाठी आपल्यावर काही बंधने घालून घेतली विशेषतः सत-संगतीचा आग्रह धरला. संगतीने मन हेलकावे खाऊन अनाचाराने वागण्याची भीती असते. सर्व दोषाला कारक ‘मन’ आहे. मनाची चंचलता चित्ताला हानिकारक असून हे चंचल मन संगतीत सहज वाहून जाते. चित्त शुध्द असेल तर द्वेषाचे निरसन होऊन सर्वांप्रती ममत्वभाव निर्माण होतो. चित्ताच्या शुध्दीसाठी मन स्थिर असावे लागते. संत संगतीने चंचल मन स्थिर होते. म्हणून सत-संगत करा हा वारकरी सांप्रदायाचा आग्रह आहे. मधाचा कंद जसा गोड आहे तसाच त्यात नव-निर्मीतीचा अविष्कारही आहे. तव्दत आपले जगणे हे गोड असावे आणि सुखाच्या निर्मितीचे ते साधन व्हावे. जसा फुलांमध्ये साठलेला मकरंद चाखण्यासाठी भ्रमर त्याकडे आकर्षित होतात. तसा प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेमरसाचा साठा निर्माण व्हावा आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी जनसमुदाय त्याच्याकडे आकर्षित व्हावा. असे झाले तर जगातून वाईटाची निवृत्ती होऊन सुखाची, आनंदाची निर्मिती होईल. वारकरी सांप्रदायाचे, संतांचे हेच तत्वज्ञान आपण समजून घेतले पाहिजे.

प्रेम, वात्सल्य आणि आनंदाचा हा प्रवाह सहजपणे तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचविणारी विचारधारा म्हणजे ‘वारकरी संप्रदाय’.!
मनुष्यजीवन सर्वांगसुंदर बनविणारी सगुण व निर्गुण ईश्वराची भक्तिमय उपासना म्हणजे ‘वारकरी सांप्रदाय’.!!

|| राम कृष्ण हरी | भवःतू सब मंगलम ||

© राजेंद्र आनंदराव शेलार
rajendra.shelar1@gmail.com


Back to top button
Don`t copy text!