रामरथ यात्रा निमित्ताने पूजा, आरती व गाडीतून प्रभू रामाची नगर प्रदक्षिणा संपन्न 


 

स्थैर्य, फलटण दि.१६ : श्रीराम मंदिर व मुधोजी मनमोहन राजवाड्यातील देवघरात प्रभू श्रीराम, सीतामाता व अन्य देवतांचे पूजन केल्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीराम रथोत्सवानिमित प्रतिवर्षी नगर प्रदक्षिणेस निघणाऱ्या परंपरागत रथामध्ये प्रभू श्रीराम, सीतामातेच्या मूर्ती ठेवून विधीवत पूजा व आरती केली. त्यावेळी सर्व मानकरी व नाईक निंबाळकर घराण्यातील मान्यवर, शासकीय अधिकारी, भाविक व ट्रस्टचे अधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने गेली सुमारे २५० वर्षाहुन अधिक काळ प्रतिवर्षी मार्गशीर्ष शु|| प्रतिपदा म्हणजे देवदिवाळी दिवशी लाखोंच्या उपस्थितीत भरणारी येथील श्रीराम रथोत्सव यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी परंपरागत पद्धतीने आदल्या दिवशी रथपूजन, आज सर्व मूर्तींचे पूजन, आरती व त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या मूर्ती रथावर विराजमान करुन रथ मंदिरातून बाहेर काढून प्रातिनिधिक स्वरुपात नगर प्रदक्षिणा करण्यात आली.

दरम्यान श्रीमंत जयश्रीमालादेवी विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर (काकीसाहेब) व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सकाळी ११.३० वाजता श्रीराम मंदिरात येऊन पूजा, आरती, दर्शन घेतले, त्यानंतर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी प्रभू श्रीरामाच्या परंपरागत नगर प्रदक्षिणेत खंड पडू नये या उद्देशाने देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक दशरथ यादव यांना बोलावून त्यांच्याकडे आपली गाडी व ड्रायव्हर देऊन गाडीतून परंपरागत रथमार्गाने प्रभू श्रीरामाची नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या गाडीतून श्रीरामाचे पुजारी अजित पेटकर, मुधोजी मनमोहन राजवाड्यातील देवघर पुजारी शामराव निकम, दशरथ यादव, बाबा सुर्यवंशी यांनी प्रभू श्रीरामाची मूर्ती व श्रीरामाच्या पादुका सदर गाडीत ठेवून दुपारी १.३० ते २.१५ या वेळेत परंपरागत रथ मार्गाने प्रभू श्रीरामाची नगर प्रदक्षिणा पूर्ण केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम रथयात्रा व रथ नगर प्रदक्षिणा रद्द करण्यात आली असल्याने गेल्या अनेक वर्षांच्या प्रथेमध्ये खंड पडणार असल्याने गाडीतून श्रीरामाची नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!