संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ पर्यंत समता पर्व होणार साजरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑक्टोबर २०२२ । सातारा । संविधान  निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि.26 नोव्हेंबर संविधान दिन ते दि.6 डिसेंबर 2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना पर्यंत समता पर्व सातारा जिल्ह्यात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती  समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे सातारा यांनी दिली.

या समता पर्वानिमित्त दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी राजवाडा पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळयापर्यंत कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वृंद, समाजकार्य महाविद्यालयातील विदयार्थी व शहरातील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 8.30 वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सातारा नगरपालिका कार्यालय येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यासमोर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा व जिल्हा समाज कल्याण अधिकारी  जिल्हा परिषद सातारा  यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन होणार आहे.

दि. 27 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, लेखी परीक्षा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 28 नोव्हेंबर रोजी संविधान विषयक ‘अधिकार व कर्तव्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि. 29 नोव्हेंबर रोजी पत्रकारांची कार्यशाळा, दि. 30 नोव्हेंबर रोजी संविधान या विषयावर भिंती पत्रक, पोस्टर, बॅनर्स व चित्रकला स्पर्धा, तसेच अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणाऱ्या समाजसेवी कार्यकर्ता, प्रतिनिधी, कर्मचारी वर्गांची कार्यशाळा होणार आहे.

जिल्हास्तरावर युवा गटांची कार्यशाळा दि. 1 डिसेंबर रोजी, दि. 2 डिसेंबर रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील वस्त्यांना भेटी, दि. 3 डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर, तसेच दि. 4 डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी, वृद्ध यांच्यासाठी कार्यशाळा, दि. 5 डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम व दि. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप, बक्षीस वितरण व समता पर्वाचा समारोप होणार आहे.

तरी  जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी  समता पर्व कालावधीत आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे अवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सातारा नितीन उबाळे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!