पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज


मानवी आहारातील  पोषक तत्त्वाच्या कमतरतेने निर्माण  होणाऱ्या आरोग्य समस्या सोडवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. सुदृढ व आरोग्यदायी समाजासाठी पौष्टिक तृणधान्य ही काळाजी गरज असून त्यांचा आहारात नियमित वापर करण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरीता ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’ साजरे करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारणीत सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीसह २४ विभागाच्या सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमार्फत महिनानिहाय वर्षभर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शास्त्रज्ञाव्दारे व्याख्याने, रॅली, महिला बचत गटांचे शिबीर, मार्गदर्शन कार्यशाळा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला, भाषण इ. स्पर्धा व जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

‘पौष्टिक तृणधान्य दिन’

वर्षारंभी मकर संक्रांत-भोगी या सणाला पौष्टिक तृणधान्ययुक्त पदार्थांचा आहारामध्ये वापर करण्याची परंपरा आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व अधोरेखित करण्यासाठी मकर संक्रांती-भोगी हा ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने  ह्या सणाला शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व  फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी, तीळ लावलेली बाजराच्या भाकरीचे सेवन करतात.

ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये तर राळा, वरई, कोद्रा, सावा व राजगिरा ही इतर लघु तृणधान्ये आपली पारंपरिक पिके आहेत. पुर्वीपासून आपल्या आहारात असलेल्या या तृणधान्यांचा वापर शहरीकरणाच्या व पाश्चात्य अनुकरणाच्या ओघात कमी होत गेल्याचे कटू सत्य तर  पिझ्झा, बर्गर आदी जंकफुडचा अवास्तव उपयोग वाढल्याचे चित्र आपल्या समोर आहे. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाब व लठ्ठपणा असे विकार वाढत आहेत. याचे दुष्परिणाम पाश्चिमात्य देशांच्या लक्षात आले आहे, म्हणूनच कोरोनानंतर आरोग्यविषयक सजगता वाढून या देशांमध्ये पौष्टिक तृणधान्याची मागणी वाढल्याचा अहवाल आहे.

भारताने इतर काही देशांच्या मदतीने तृणधान्याचे महत्व सर्व राष्ट्रांना समजावे म्हणून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष हा ठराव संयुक्त राष्ट्र संघात मांडला. ७० देशांनी या ठरावाला अनुमोदन दिले. आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व १९३ सदस्य राष्ट्रांनी भारताच्या या अभियानाला बहुमताने मंजूर करुन दि. ३ मार्च २०२१ रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याचे घोषीत केले.

तृणधान्यांचे पोषणमूल्य

ज्वारी : रक्तातील सारखेची पातळी नियंत्रित करते. रक्ताभिसरण वाढवते. ज्वारी वजन कमी करण्यास मदत करते. हाडांच्या आरोग्यासाठी ज्वारी उपयुक्त ठरते. शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते. तसेच ह्रदयाचे आरोग्यही ज्वारीमुळे सुधारते.

बाजरी : बाजरीमध्ये कॅल्शियम, विटामिन A, B व फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित, रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व ॲनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे.

नाचणी : शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ॲनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात. नाचणीमुळे लठ्ठपणा कमी करणे, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते.

राळा : यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवते. त्यातील अँटीऑक्सिडन्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मोड आलेले राळा खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात. तसेच अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर होतो.

वरई : नवजात शिशु, बालक आणि माता यांच्यासाठी उत्तम पोषकधान्य आहे. सदृढ आरोग्य व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास वरई उपयुक्त आहे. वरई मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या रोगांचा धोका कमी करते.

तृणधान्य उत्पादनामुळे शेतकऱ्यांना लाभ

तृणधान्य पिके ही कमी गुंतवणुकीत घेता येतात. इतर पिकांच्या तुलनेत या पिकांना पाणी कमी लागते तसेच ती वातावरणाचा ताण सहन करू शकतात. तृणधान्य पिकांची वेगाने वाढ होते. इतर पिकांच्या तुलनेत या पिकांबाबत कीड-रोग समस्या फारशा नाहीत. कमी क्षेत्रातही ही पिके यशस्वीरित्या घेतली जावू शकतात. स्वास्थ्य आहारासोबतच जनावरांना चाराही पुरवतात. कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नास पौष्टिक तृणधान्य पिके पूरक आहेत. भविष्यातील कल पाहता सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यासाठी तसेच शेतकरीवर्गाला आर्थीक उत्पन्न वाढीसाठी तृणधान्य पिके फायदेशीर ठरणार आहेत.

 

संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, अकोला


Back to top button
Don`t copy text!