
दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑगस्ट २०२६ | परभणी |
राज्यात विविध स्पर्धा आणि शैक्षणिक परीक्षांमधील पेपरफुटीची मालिका सुरूच असताना, आता नर्सिंगचा पेपरही फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परभणी येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा पर्यवेक्षिकेनेच आपल्या बहिणीसाठी मोबाईलवरून प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नानल पेठ पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळामार्फत परभणीतील इंदिरा गांधी एएनएम नर्सिंग स्कूलमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती. २० ऑगस्ट रोजी सकाळी जीएनएम प्रथम वर्षाचा पेपर सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत, म्हणजेच सकाळी १०.२९ वाजता केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नियुक्त असलेल्या राखी चव्हाण यांनी आपल्या मोबाईलचा वापर करत थेट प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले आणि ते व्हॉट्सअॅपवरून आपल्या बहिणीच्या मोबाईलवर पाठवून दिले.
परीक्षा सुरू असतानाच प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर गेल्याची शंका आल्यानंतर केंद्र निरीक्षक विश्वजीत मठपती यांनी संबंधित महिला पर्यवेक्षिकेची झाडाझडती घेतली. तिच्या मोबाईलची तपासणी केली असता, मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याचे स्पष्ट निदर्शनास आले. परीक्षा केंद्राच्या नियमांचे उल्लंघन आणि गोपनीयतेचा भंग झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर केंद्र निरीक्षकांनी लगेचच पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे नानल पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हा पेपर इतर विद्यार्थ्यांनाही विकला गेला होता का आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी केंद्र निरीक्षकांच्या तक्रारीवरून महिला पर्यवेक्षिका राखी राजेश चव्हाण, तिची बहीण राणी राजेश चव्हाण यांच्यासह त्यांची ओळख असलेल्या प्रतीक्षा किरण खिल्लारे, ईश्वर बाराबोईना आणि दिलीप बोरकर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना जामीन मिळाला, तर पाचव्या संशयिताला पुढील कारवाईसाठी न्यायालयात सादर केले जाणार आहे.
