
नीरा खोऱ्यातील धरणे ९९ टक्के भरली असून भाटघर व वीर धरण शंभर टक्के भरले आहे. वीर धरणातून तब्बल ११ हजार १०० क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०८ ऑगस्ट : नीरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत येत असलेल्या नीरा प्रणालीतील धरणांमध्ये एकूण ९९.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. भाटघर आणि वीर ही दोन प्रमुख धरणे १०० टक्के भरली असून वीर धरणातून नदीपात्रात ११ हजार १०० क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
भाटघर आणि वीर धरण १०० टक्के पूर्ण
नीरा खोऱ्यातील ४८.३३ टीएमसी एकूण क्षमतेपैकी सद्यस्थितीत ४७.८८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यामध्ये भाटघर धरणात २३.५० टीएमसी (१००%), वीर धरणात ९.४१ टीएमसी (१००%), नीरा देवघर धरणात ११.६५ टीएमसी (९९.३२%) तर गुंजवणी धरणात ३.३२ टीएमसी (८९.९७%) साठा उपलब्ध आहे. भाटघर धरणातून २ हजार ३९५ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कालव्यांद्वारे पाण्याचा वापर व विसर्ग
वीर धरणातून जुलै महिन्यापासून आतापर्यंत १८.२३४ टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले आहे. नीरा डाव्या कालव्यातून ७५० क्यूसेक्स तर नीरा उजव्या कालव्यातून १ हजार ५५० क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. तिसंगी प्रकल्पात २.३९ टक्के आणि म्हसवड प्रकल्पात १०.०४ टक्के पाणीसाठा झाला असल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रा. पो. मोरे यांनी दिली आहे.
