
निंभोरे विकास सेवा सोसायटीच्या जिल्हा बँक प्रतिनिधी ठरावात राजे गटाला धक्का देत किशोर मोरे यांच्या नावाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
स्थैर्य, निंभोरे, दि. ३० जुलै : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निंभोरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजे गटाच्या विरोधात जात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक किशोर मोरे यांच्या नावाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
रणनीती ठरली यशस्वी
फलटण विधानसभा प्रमुख अमित रणवरे यांनी आखलेली रणनीती या निवडणुकीत यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले. निंभोरे सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा राजकीय फेरबदल घडून आला असून संचालकांनी ठाम भूमिका घेत किशोर मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नेत्यांकडून अभिनंदन
या यशानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, विष्णुपंत लोखंडे, धनंजय साळुंखे पाटील, अभिजीत नाईक निंबाळकर आणि अमित रणवरे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी किशोर मोरे यांचे अभिनंदन केले.
