
महात्मा एज्युकेशन सोसायटी व लोकजागर प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीराम विद्याभवन येथे गुरुजनांचा सत्कार आणि विद्यार्थ्याना साहित्याचे वाटप करण्यात आले.
स्थैर्य, फलटण, दि. ३० जुलै : ध्येयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आणि प्रेरणा अत्यंत महत्त्वाची असते. यातूनच व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा मिळते आणि ध्येय गाठण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो, असे प्रतिपादन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले.
महात्मा एज्युकेशन सोसायटी आणि लोकजागर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीराम विद्याभवन, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय आणि चतुरबाई शिंदे बालक मंदिर येथील गुरुजनांचा सत्कार व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक रवींद्र बेडकिहाळ अध्यक्षस्थानी होते.
शिस्त आणि संस्कारातूनच प्रगती
शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया ठरते, असे रवींद्र बेडकिहाळ यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. व्यवसायीक महेश गरवालिया आणि शांताराम आवटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात सरस्वती पूजन करून गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. भारती विद्यापीठाच्या इंग्रजी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या अनया पवार हिचा तसेच अकॅडमी प्रमुख राकेश कुलकर्णी व निकिता कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने मनीष निंबाळकर यांनी केली. दीपाली निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अरुण खरात यांनी आभार मानले.
