
थेट WhatsApp वर मिळवा
अपुऱ्या पावसामुळे तांदूळ उत्पादनात घट झाली असून बाजारात दरांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झाली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १७ सप्टेंबर : देशात अपुऱ्या पावसामुळे आणि खरीप हंगामातील लागवड क्षेत्र घटल्याने तांदळाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. या घटलेल्या उत्पादनामुळे आणि मर्यादित साठ्यामुळे बाजारात तांदळाच्या दरात १५ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. डाळ, भाजीपाल्यापाठोपाठ आता तांदूळही महागल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचे बजेट पार कोलमडले आहे.
उत्पादनात ७० लाख टनांची घट
केंद्रीय कृषी मंत्रालय व बाजार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भात शेतीला मोठा फटका बसला आहे. लागवडीखालील क्षेत्र सुमारे १४ लाख हेक्टरने घटल्याने यंदा तांदूळ उत्पादनात ७० लाख टनांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नव्या पिकाची आवक सुरू होण्यास अजून अवधी असल्याने जुन्या साठ्यावर ताण आला असून त्यामुळे किमती सातत्याने उंचावत आहेत.
बिगर-बासमती तांदूळ २५ टक्क्यांनी महाग
सध्या बाजारात बासमती तांदळाच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर रोजच्या वापरातील बिगर-बासमती आणि सोना मसुरीसारख्या तांदळाचे दर २५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ५० ते ५२ रुपये किलोने मिळणारा तांदूळ आता ६३ ते ६५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. ऑक्टोबरअखेर नवीन पीक बाजारात येईपर्यंत दरामधील तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.