
भारतीय जनता पक्षाच्या ‘संपर्क से समर्थन’ अभियानांतर्गत राष्ट्रीय संघटन महामंत्री शिवप्रकाश यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते निंभोरे येथे भेट देणार आहेत.
स्थैर्य, निंभोरे, दि. १९ जुलै : भारतीय जनता पक्षाच्या ‘संपर्क से समर्थन’ अभियानांतर्गत पक्षाचे राष्ट्रीय संघटन महामंत्री शिवप्रकाश यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पदाधिकारी निंभोरे (ता. फलटण) येथे भेट देणार आहेत. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अमित रणवरे यांच्या निवासस्थानी या सदिच्छा भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, 20 जुलै रोजी सकाळी 08:30 वाजता हा दौरा नियोजित आहे. या दौऱ्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन प्रमुख रवी अनासपुरे आणि सरचिटणीस राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पक्षाच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
या दौऱ्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर आणि सभापती शिवांजली भोसले प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची राजकीय रणनीती निश्चित केली जाणार आहे.
या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, बीएलए 2 प्रतिनिधी, बूथ कमिटी अध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी या संवाद दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
