नैसर्गिक आपत्तीवर मात केली मात्र शासकीय कायदे आणि शेतमालाचे पडलेले दर यापुढे शेतकरी हतबल


 

स्थैर्य, फलटण दि. ५ (अरविंद मेहता यांजकडून) : अतिवृष्टी, वादळ वारे, नदी नाल्यांना आलेले पूर यामध्ये खरीप वाहुन गेले आता रब्बी जोरात आणू म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने अहोरात्र मेहनत घेऊन रब्बीची पिके जोमदार आणली असताना शेतमालाला रास्त भाव नाही, सरकारने केलेले कायदे आणखी अडचणी निर्माण करणारे, आणि हमी भाव जाहीर केले मात्र खरेदीची यंत्रणा नसल्याने त्याही केवळ घोषणा ठरत असल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.

पांढरे सोने पिकविले मात्र विक्री व्यवस्था नसल्याने कवडी मोलाने विक्री


खरीपातील वाचलेली ज्वारी, बाजरी, मका कवडी मोलाने विकल्यानंतर एकेकाळी कापसाचे आगर असलेल्या फलटण तालुक्यात काही शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने कपाशीचे पीक घेतले, सुमारे २५०/३०० हेक्टरवर लागण झाली, पिके जोमदार आली. सुमारे ३०/३५ वर्षानंतर कापसाचे आगर समजल्या जाणाऱ्या फलटण तालुक्यात या पांढऱ्या सोन्याचे चांगले उत्पादन निघाले मात्र विक्रीची व्यवस्था नसल्याने कापूस शेती पुन्हा आत बट्याचा व्यवसाय झाला.

कोट्यवधींचे शेअर्स घेतलेल्या सहकारी संस्थेने कापूस पिकासाठी सहकार्य करावे


फलटण, बारामती, अकलुज, पंढरपूर भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे शेअर त्यांच्या कापसाच्या पट्टीतून कापून घेऊन उभ्या राहिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने या शेतकऱ्यांना त्यांच्या कोट्यवधींच्या शेअर भांडवलावर आतापर्यंत १ रुपयाही लाभांश दिला नाही, शेअर्स सर्टिफिकेट दिली नाहीत आता किमान या भागात पुन्हा सुरु होत असलेल्या कापूस उत्पादनाला या सहकारी संस्थेने सक्रिय पाठींबा देऊन येथील कापूस उत्पादकांना कापूस लागणी पासून पीक तयार होईपर्यंत आवश्यक मार्गदर्शन करावे, पीक तयार झाल्यावर त्याच्या खरेदीची व्यवस्था करावी त्यातून या भागातून नामशेष झालेले कापूस पीक पुन्हा येथील शेती व शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकेल.

पांढरे सोने ऊसाला साथ करील


राज्य शासन कृषी खाते, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांनी पुढाकार घेतल्यास या भागात हे पांढरे सोने पुन्हा येईल त्यातून केवळ शेतकरी नव्हे अन्य अनेक समाज घटकांना नवसंजीवनी प्राप्त होणार आहे, त्यातून आज केवळ ऊसाच्या शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल. अनेकांना रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होतील.

आणखी एका साखर कारखान्याची उभारणी करा


फलटण तालुक्यात ऊसाचे क्षेत्र सुमारे १७/१८ हजार हेक्टर पर्यंत पोहोचले असून त्याच्या गाळपाची पुरेशी व्यवस्था नसल्याने तालुक्यातील ४ साखर कारखान्यांशिवाय शेजारच्या माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती, जरंडेश्वर या कारखान्यांना ऊस नेण्यासाठी विनवणी करावी लागत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तालुक्यातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढ किंवा दररोज ५ ते ७ लाख मे. टन गाळप क्षमतेचा आणखी एक साखर कारखाना या तालुक्यात उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

तालुका १००% बागायत होण्यासाठी ठोस भूमिका आवश्यक


पूर्वी केवळ भाटघर, वीर या दोन पाटबंधारे प्रकल्पांचे पाण्यावर फलटण तालुक्याचे एक तृतीयांश क्षेत्र बागायत होते, नव्याने उभारण्यात आलेल्या नीरा-देवघर व धोम-बलकवडी पाटबंधारे प्रकल्पाद्वारे संपूर्ण तालुका १०० % बागायत होणार अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात पाणी अडविले गेले तरी कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने त्याचा फायदा लाभ क्षेत्राला होताना दिसत नाही, 

त्याचे योग्य नियोजन करुन आगामी काळात फलटण तालुका १०० % बागायत होण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.

शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणी आणि कापूस लागणीला प्रोत्साहन आवश्यक


तालुका १०० % बागायत होत असताना उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करणारे कारखाने उभे राहिले पाहिजेत त्यामध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे आणखी एक साखर कारखाना तर आवश्यक आहेच, परंतू त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर विकसीत झालेले फळबागेचे क्षेत्र विचारात घेता येथे फळ प्रक्रिया उद्योगांची उभारणी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे नामशेष झालेले कापूस पीक पुन्हा उभारी घेत असताना कापसा खालील क्षेत्रात भरीव वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत कापूस रास्त दरात खरेदीची किंबहुना जिनिंग, प्रेसिंग वगैरे यंत्रणा उभी राहिली तर कापसाला योग्य दर मिळण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकेल, त्यादृष्टीने कापूस पिकाकडे पाहिले पाहिजे, खरेच पांढरे सोने म्हणून ते पुन्हा येथे रुजले पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

मका प्रक्रिया उद्योग उभारणी व हमीभाव खरेदीसाठी प्रयत्न गरजेचे


मका पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत असताना पुरेशा प्रमाणात प्रक्रिया उद्योग नसल्याने आणि शासन हमी दरात मका खरेदी करताना अनेक अटी घालुन मका उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याने प्रसंगी कमी दरात मका विकून शेतकरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यातून मकेखालील क्षेत्रात घट होण्याचा धोका असल्याचे दिसून येते त्यासाठी आतापासूनच योग्य दक्षता घेऊन मका हमी भावात खरेदी होईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

खरीप वाहुन गेले मात्र रब्बी जोमदार, मात्र शेतमालाला रास्त दर नसल्याने नाराजी


खरीप वाया गेल्यानंतर रब्बी ज्वारी, गहु, मका, हरभरा क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले आहे, तालुक्यात १५४४६ हेक्टरवर ज्वारी, ३४८७ हेक्टरवर गहू, २५८७ हेक्टरवर मका पीक घेतले असून गव्हाच्या क्षेत्रात आणखी वाढ अपेक्षीत आहे. तुटणाऱ्या ऊसाचे क्षेत्रात गव्हाचा पेरा केला जात असून कारखान्यांचे गळीत हंगाम वेगात सुरु असल्याने गव्हाच्या क्षेत्रात वाढ होत आहे, सर्व पिके जोमदार असून अद्याप चिकटा किंवा अन्य कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.

एक हजार हेक्टरवर कांदा लागणी


तालुक्यात ११२४ हेक्टरवर हरभरा, एक हजार हेक्टरवर कांदा, ९० हेक्टरवर टोमॅटो, त्याचप्रमाणे भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहेत.

नीरा उजवा कालव्यात साडेतीन महिन्यानंतर पिकासाठी पाणी


दरम्यान नीरा उजवा कालवा दि. १५ ऑगस्ट रोजी बंद झाला तो नुकताच सुरु करण्यात आला आहे, सुमारे साडेतीन महिन्यानंतर कालव्याचे पाणी सुटल्याने उभ्या ऊस पिकांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अतिवृष्टीमुळे जमिनीत वापसा नसल्याने शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली नाही, परंतू त्यानंतर ऊसाच्या आडसाली लागणी व उभ्या ऊसासाठी पाण्याची आवश्यकता असताना पाटबंधारे खात्याने नीरा उजवा कालव्यात पाणी न सोडल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कुचंबना झाली होती, आता पाणी सुटल्याने शेतकरी सुखावला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!