दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२३ । नागपूर । सामाजिक, सांस्कृतिक, कला, साहित्य, विचार, वारसा या अभ्यासासोबतच आर्थिक व औद्योगिक घडामोडींवर नागपूर कन्व्हेंशन सेंटर एक बौद्धिक संपदा म्हणून तयार होत आहे. त्यामुळे नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर नागपूर, विदर्भातील अभ्यासकांसाठी मोलाचा ठेवा म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सेंटरचे लोकार्पण झाले. खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री डॉ. नितीन राऊत, चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण दटके, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सभापती मनोज सूर्यवंशी आणि समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रमोद नारनवरे आदी मंचावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या कन्व्हेंशन सेंटरचे लोकार्पण होत आहे. याचा अत्यंत आनंद आहे. विदर्भ व नागपूरसाठी हे केंद्र अत्यंत उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच या केंद्राच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वस्त केले. या भव्य सेंटरमध्ये प्रवेश करतानाच बाबासाहेबांचे दर्शन व्हावे यासाठी येथे उभारावयाच्या ४० फूट उंचीच्या बाबांसाहेबांच्या पुतळ्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त ५ कोटींचा निधी लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
बाबासाहेबांनी भारताला राज्यघटना दिली. राज्य घटनेमुळेच देश एक आर्थिक महासत्ता म्हणून नावारुपाला येत आहे. राज्यघटनेमुळे सर्वाँना संधीची समानता निर्माण झाली आहे. शंभर वर्षांपूर्वी ‘प्रॉब्लेम ऑफ रुपिज’, हा ग्रंथ लिहून बाबासाहेबांनी आजच्या काळातील आर्थिक प्रश्नांना हात घातला होता. भारतीय समाजापुढे काळया पैशाचा प्रश्न निर्माण होण्याची संकल्पना त्यांनी मांडली. ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी दूरदृष्टी दाखवत नॅशनल ग्रीडची संकल्पना मांडली. त्यांनी जलसंपदा क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. नदी जोड प्रकल्पाची संकल्पना मांडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या दिशेने कार्य करून देशाला पुढे घेवून जात आहेत.
बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या राज्य घटनेतील कर्तव्यांचे पालन करून या मार्गावर सर्वाँनी चालावे असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.
यावेळी, बोलताना केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर नागपूरच्या समतोल विकासाची ग्वाही दिली. उत्तर नागपूरमधून एक हजार कोटीचा उड्डाणपूल बनत आहे. यामुळे या क्षेत्राचा कायापालट होईल. उत्तर नागपूरवर अन्याय होणार नाही. या ठिकाणचे कोणतेच प्रकल्प अडणार नाही. विकासात कोणतेच राजकारण अडसर ठरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेन्टरचे पावित्र्य राखण्याचे आवाहन त्यांनी केले.बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे, व्यक्तिमत्त्वाप्रमाणे अभ्यासाप्रमाणे, या ठिकाणी कार्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हा कार्यक्रम नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आयोजित केला होता. उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सभापती मनोज सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले तर समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रमोद नारनवरे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमात गड्डीगोदाम येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहाचे आभासी लोकार्पण करण्यात आले.