दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२३ । सातारा । डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान होते. त्यांनी केवळ ज्ञानाच्या जोरावर रक्तचा एकही थेंब सांडता करोडो लोकांना गुलामीतून मुक्त केले. बहुजन विद्यार्थ्यानी आपला इतिहास समजावून घेऊन बहुजन उद्धारक महामानवांच्या विचाराने एकजूट झाले पाहिजे व राष्ट्र विघातक शक्तीचा बीमोड करून महामानवांना अपेक्षित असलेला समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी पुढे यावे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाच्या एकतेसाठी प्रेरणादायी आहेत’ असे मत छत्रपती शिवाजी कॉलेजमधील इंग्रजी विभागातील प्रा.केशव पवार यांनी व्यक्त केले.ते सातारा येथील सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह येथे आयोजित केलेल्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते..कार्यक्रमाचे अध्यक्ष वस्तीगृहाचे अधीक्षक श्री बोराटे होते .
पुढे बोलताना म्हणाले की, ‘तथागत गौतम बुद्ध, छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांनी जीवन देऊन न्यायासाठी संघर्ष करून समतावादी भारत देश घडविला आहे पण आज पुन्हा एकदा मूठभर मनुवादी लोक बहुजनांना गुलाम बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीय संविधानाने बहुजन समाजाला दिलेले शिक्षण आणि आरक्षण आज धोक्यात आले असून संविधान रक्षण करण्यासाठी संघटीत होऊन विधायक जनजागृती करून संविधानाचे महत्व पटवून दिले पाहिजे असे ते म्हणाले .
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना श्री.बोराटे म्हणाले की विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन करियर करून स्वतःचे व समाजाचे हित करावे..कार्यकर्माचे सूत्रसंचालन आकाश कांबळे यानी केले. प्रथमेश ठोंबरे, कुणाल देवकुळे व वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन केले.