
दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । आटपाडी । मुस्लीम खाटीक हा महाराष्ट्रातील आणि देशातील एक पिचलेला,दबलेला समाज आहे . मटनाचे थोडे जरी दर वाढले तरी त्याचे गावातील दुकान बंद केले जाते . त्यालाही महाग खरेदी करावे लागते याचा विचार ही कोणी करीत नाही . आर्थिक तणावाचा जो संताप, कुचंबना आणि त्यामुळे येणारी गरीबी याचा ताण मग तो घरात आणि समाजात काढू लागतो . आज मुस्लीम खाटीक समाजात हुंडा देण्याची स्थिती नसल्याने मुलींचे खोळंबलेले विवाह, किरकोळ गैर समजातून योग्य तोडगा न काढल्याने होणारे घटस्फोट यामुळे खेळत्या बागडत्या वयातल्या मुलीं बरोबरच मुस्लीम खाटीक परिवारात घटस्फोटीता – तलाकशुदा, वय वाढलेल्या मुलींचे प्रमाण वाढत चालले आहे. या मुलींचे करायचे काय ? त्यांच्या भवितव्याचे काय ? याचा विचार गांभीर्याने करायची वेळ आली आहे . दुसरीकडे नात्यातल्या नात्यात अगदी जवळच्याच कुटुंबात बेटी व्यवहार होत आल्याने आता या एकाच रक्ताच्या परिवारांमध्ये वंश विकृती निर्माण होऊ लागली आहे . त्यामुळे गावागावात किमान एक दोन तरी कुटुंबात एखादे मुल जन्मतः अपंग, ओठ – टाळा दुभंगलेले, मतीमंद, गतिमंद, मुले जन्माला येवू लागली आहेत . अशा मुलांचा सांभाळ आयुष्यभर करणे ही त्यांच्या जन्मदात्यांवर केवळ दुरदृष्टी अभावी येवून पडलेली जबाबदारी आहे आणि त्यांना ती संपूर्ण आयुष्यभर पार पाडावी लागणार आहे . मानववंश शास्त्रानुसार ही विकृती पुढच्या पीढीत बदलायची असेल तर खुप दुरच्या किंवा नात्याबाहेर च्या समाजातील नव्या परिवाराशी बेटी व्यवहार केले पाहीजेत . इस्लाम धर्म आपले सर्व अनुयायी समान आहेत असे म्हणतो . आपल्या काही पुर्वजांनी चुक करून उच्च – कनिष्ट, काळा – गोरा, गरीब – श्रीमंत , इस्लामी असुनही जाती बाहेरचा, दुसऱ्या जातीचा ठरवून बेटी व्यवहार नाकारले . त्याचे परिणाम इस्लाम मधील अनेक जाती भोगत आहेत . त्यात मुस्लीम खाटीक मोठ्या प्रमाणात भरडला जातोय . प्रेषितांनी धर्म स्थापन करताना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जी मार्गदर्शक तत्वे पुढे ठेवली आणि प्रसंगी एखादा निर्णय स्वतःच्या बुद्धीने घेण्याची जबाबदारी ही सोपविली त्या जबाबदारीला जागून काही निर्णय घेण्याची आता वेळ आली आहे .
सर्वप्रथम आपण मुलींच्या बाबतीत प्रेषितांचे आणि आपले आचरण तपासुया . प्रेषितांनी इस्लाम धर्म स्थापना केली. इस्लाम च्या अनेक तरतुदी मध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना हक्क, लग्नात मान्यतेचा किंवा कबुलीचा हक्क, तलाक देण्याच्या पद्धतीत पुरुषाला ३ वेळा विचार करण्यास ,तडजोड घडवून आणण्यास हक्क आणि त्याचवेळी स्त्रीला एका महिन्याच्या मुदतीनंतर वेगळं होण्याची मुभा, यावरून प्रेषितांनी इस्लाममध्ये स्त्रियांना दिलेले महत्व लक्षात येते . सहमतीने संसार चालवावा आणि स्त्री चा ही सन्मान वाढावा . या प्रेषितांच्या विचारांपासून आपण कुठे चाललो आहोत . याचा गांभीर्याने विचार जाणत्या माणसांनी करायची वेळ आलेली आहे . त्यासाठी फार मोठ्या क्रांतीची गरज आहे . फक्त आपल्या धर्म संस्थापकांनी घालून दिलेले आदर्शा प्रमाणे बिनचूक वाटचाल केली तरी आज ही या समस्यातून मार्ग काढणे अवघड होणार नाही .
आता मुस्लीम खाटीक समाजातील पुरुषाला दिवसभर उन्हां ताणात राबावे लागते . भल्या पहाटे त्याचा दिवस सुरु होतो . भर दुपारपर्यंत शे – दोनशे किलोमीटर वरच्या बाजारात बकरी खरेदी करून गावापर्यंत येईस्तोवर त्याचा निम्मा दिवस गेलेला असतो . थोडीशी घाई गडबडीत पोटपुजा करून मार्केट – दुकानात तो स्वतः गाडून घेत अगदी रात्री उशीरापर्यत कातड्याला मीठ लावेपर्यत त्याची गाढवी कष्टाची दिनचर्या सुरु असते . या सगळ्या ओढाताणीत त्याच्या दुकानात बोकड टांगलेले दिसत असले तरी अप्रत्यक्षात या मुस्लीम खाटिक बांधवांने दुकानात बोकडा ऐवजी स्वतःलाच उलटे टांगून घेतलेले असते . याचे भान ना त्याला असते ना समाजाला . या सगळ्यात तो देणी – घेणी कधी पाहील . रोजचा व्यवहार कधी चालवेल, मिळालेल्या तुटपुंज्या फायद्यात प्रपंच, खर्च चालवून मुला बाळांचे शिक्षण कधी करेल, पै-पाहुणे ,नाती – गोती, आहेर – माहेर, सण – समारंभ, आजार – पाजार यासाठी पैशाची तजवीज कुठुन करेल . हा प्रश्न असताना लग्न समारंभा वरील खर्च आणि हुंड्याचे सावट त्याच्या जगण्याला ” जहांन्नम ” बनवत चालले आहे . समाजातील मुठभर लोकांना, तेही मोठ्या शहरात, मोठे व्यवहार करतात म्हणून रक्कम साठवून थोडेसे श्रीमंतीत जगणे जगता आले म्हणजे सारा समाज श्रीमंत झाला असे होत नाही . पण त्या अल्पशा श्रीमंत व्यक्तीने केलेला सण – समारंभाचा खर्च पाहून गावो गावचे खाटीक स्त्री – पुरुष बिथरतात . आपल्या मुलांचे असेच लग्न झाले पाहीजे, सुनेच्या माहेरातून मोठा हुंडा मिळाला पाहीजे यासाठी ते आग्रही असतात . मुलींचे लग्न करणे हेच मोठे आव्हान असलेला पिता आणि त्याचे कुटूंब या दबावाला बळी पडते आणि त्यांच्या हाल – अपेष्टात अधिक भर पडते . आपला जसा मुलगा आहे तशीच मुलगीही आहे आणि या संकटातून आपल्याला ही जावेच लागणार आहे हे विसरून जे लोक सुनेच्या माहेरच्यांना लुबाडतात . ते पुढे स्वतः ही अडचणीत येतातच, मग त्यांच्या मदतीला कोणी जवळचा ही नातेवाईक येत नाही . आपल्या आणि आपल्या जातीतील इतर समाज बांधवांची आर्थिक परिस्थिती माहीत असून ही ज्या स्त्रिया आणि पुरुष असे वागतात . त्यांच्या संख्या वाढल्यानेच हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे . दुसरी समस्या सौदर्य आणि गोरे पणाच्या अति आग्रहाची . मुस्लीम खाटीक समाज ज्या गंभीर परिस्थितीतून इस्लाम धर्माकडे वळला, त्या काळा – गोरा, उच्च – कनिष्ट, गरीब – श्रीमंत भेदभावाच्या या वाईट प्रथा इस्लाम धर्मातही त्याने सुरु ठेवल्या . अलीकडच्या काही वर्षात हे सौंदर्य आणि गोरे पणाचे वेड वाढत चालले आहे . मुलगा काळा रापलेला, बेढब, अंगठे बहाद्दर, उर्मट – उद्दाम, बोंबल भिक्या असला तरी त्याला पत्नी गोरी, सुंदर आणि मोठा हुंडा देणारीच हवी . या आग्रहाने काळ्या – सावळ्या, जाडी असणाऱ्या , अपंग मुलींचे विवाह लवकर होत नाहीत . काहींना आजन्म बिनलग्नाची राहण्याची शिक्षा भेटते . आणि त्या मुलींना परिवार ओझ्यासारखे वागवतो . आयुष्यभर कुचंबना सहन करीत या मुली जीवन संपवितात किंवा त्याचे निमित्त करून कुटुंबात कलह पेटतात . हे सामाजीक वास्तव आता शांतपणे समजून घ्यायची वेळ आली आहे . बऱ्याच कुटूंबात असे का होते त्याची कारणे ही वर दिल्या प्रमाणे आहेत . समाज त्यावर विचार करेल पण कृती करायची ती प्रत्येक व्यक्तीलाच आहे . प्रत्येक कुटुंबातील स्त्री – पुरुषाने आपल्या मुला – मुलीच्या व्यक्तीमत्वाला साजेसे, तशाच व्यक्तीमत्वाचे जोडीदार स्विकारले आणि आर्थिक प्रश्न लक्षात घेऊन विवाहांचे स्वरूप बदलले , हुंडा प्रथा संपविली तर प्रत्येक मुस्लीम खाटीक व्यक्ती स्वतः बरोबर आणखी एका मुस्लीम खाटीक परिवाराचे कल्याण करू शकेल .
हा मुद्दा सर्वांनाच मान्य होईल पण मुस्लीम खाटीक यांच्या सारखीच परिस्थिती असणारे मुस्लीम समाजातले मुल्ला – मुलाणी, शेख ,सय्यद ,पठाण, मोगल, आतार, तांबोळी, बागवान, नदाफ, पिंजारी, शिकलगार, कळवात, फकीर, मेहतर, दरवेशी, काझी वगैरे जातींच्या उतरंडीतले सर्व समाज घटक अशा जातीं मध्ये परस्पर बेटी व्यवहार होऊ लागले तर प्रत्येकाला खऱ्या अर्थाने समाजाच्या विस्तारास आणि स्वतःला आधार मिळविण्यास किंवा दुसऱ्यांचे आधार बनण्याची ही संधी मिळेल . एकमेकांच्या हातात हात घालून पुढे गेल्या शिवाय सर्वच मुस्लीम जातीना आता पर्याय राहीलेला नाही .
न्यायमुर्ती राजेंद्रसिंह सच्चर यांच्या नेतृत्वा खालील सच्चर आयोगाने भारतातील सर्वच मुस्लीम समाज आर्थिक, सामाजीक, शैक्षणीक दृष्ट्या किती रसातळाला पोहचला आहे, याच्या गंभीर नोंदी केल्या आहेत . ज्या समाजात ए पी जे अब्दुल कलाम , मौलाना अबुल कलाम आझाद जन्माला आले, जो समाज एके काळी इथला राज्यकर्ता होता, त्या समाजाची आजची अवस्था अशी होण्या मागे फक्त अन् फक्त शिक्षणाचा अभाव आणि चुकीच्या रूढी – परंपरा जपण्याचा हट्टाग्रह आहे . सच्चर आयोगाने जेव्हा मुस्लीम समाजातील स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या आणि सरकार कडून तुम्हांला काय पाहीजे असे विचारले तेव्हा घराघरातील त्या महिलांनी एकच उत्तर दिले . *” हमारे बेटी – बच्चोंको अच्छी तालीम मिलनी चाहीए. “* महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई ज्योतिबा फुले आणि त्यांच्या शिष्या फातीमा शेख यांनी आपल्या समोर मोठा आदर्श ठेवला आहे . छत्रपती शिवाजी महाराज , फुले दांम्पत्य, फातीमा शेख, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , राजर्षि छत्रपती शाहुजी महाराज इत्यादी महामानवांचे, त्यांच्या आदर्शाचे, विचारांचे आपण आपल्या सभा – समारंभात तरी स्मरण करतो का ? याचा ही साकल्याने विचार झाला पाहीजे . *महात्मा फुले, शुद्रांचे अधःपतन कशामुळे झाले हे सांगताना “विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, आणि गति विना शुद्र खचले,एवढे अनर्थ एका अविद्येने केले.” हे जगातील त्रिकाला बाधीत सत्य सांगून गेले आहेत* भारतातील मुठभर श्रीमंत आणि स्वतःला उच्च वर्णीय समजणारे राज्यकर्ते मुस्लीम सोडले तर देशातील उर्वरीत मुस्लीम हा महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात तसा शुद्रा मध्येच मोडतो .
संसाराचा गाडा कसा तरी ओढणाऱ्या अशिक्षित पतीची ओढाताण , आहे त्या परिस्थितीत ही कुटुंबाला जगविणारी मुस्लीम स्त्री , माझ्या मुलीं – मुलांना शिक्षण मिळाले तरच मुस्लीम समाजाची प्रगती होईल हा विचार करते , कारण शिक्षणाने इतर समाजाचे बदललेले आर्थिक वास्तव आणि विवंचनेच्या जाळात जळणारा तिचा संसार तिला स्पष्टपणे दिसत असतो . तिला आपली गरीबी झाकून दुसऱ्याच्या लग्नात वकील आणि गवाह बनून मिरवायचे नसते. ( अतिशय नेक, चांगले काही मान्यवर महोदय लग्नात वकील, गवाह बनत असतात हा अपवादही आहे ). चांगल्या काही गोष्टी, ज्ञान माहीत नसताना उगाचच तिला लग्नाच्या माईक वरून मिजास मारायची नसते आणि मोठे पणाची झुल पांघरून आपली गरीबी लपवायची ही नसते . अर्धा – किलोभर मटन ताटात आले तरच लग्न झकास झाले अन्यथा नाही . असे सर्वत्र ओरडत जायचा ती कधी प्रयत्नही करीत नाही . निकाह नंतर उपस्थितांच्या कडे फेकल्या जाणाऱ्या बदाम ,खजूर, खडी साखरेच्या ताटातले निम्मे अर्धे आपल्याच खिशात कोंबायच्या, या भानगडीत ती कधीच पडत नाही . किंवा आपण फार मोठे कोणी तरी आहोत असा समज करून घेत, न बोलावता स्टेजवर दर्शनी जागा अडवणारांमध्ये ही माऊली कधी नसते.अशा महा पराक्रमी कर्त्या पुरुषांची ही लबाडी तिला चुलीत जाळायला ही उपयोगी येत नाही . तिला फक्त घरातल्या वस्तुं मध्ये आपल्या मुलांची भुकेली तोंडं दिसत असतात . त्यांचं पोट भरण्यासाठी ती प्रसंगी कष्ट करायला तयार होते . नवऱ्याच्या उद्योग व्यवसायाला हातभार लावण्याची तिची तयारी असते पण आमच्या या ५० टक्के लोकसंख्येला आम्ही वाव देतो का ? बोकड खरेदी करण्यास परगावी गेलेल्या नवर्याचे दुकान चालविण्यासाठी – मटन विक्री करणाऱ्या स्त्रीचे, त्यांच्या कष्टाचे, धाडसाचे कोड कौतूक आपण कधी करतो का ? समाज धूरीण म्हणवून घेणाऱ्यांनी , कधी नवऱ्या बरोबर प्रसंगी नवरा गेल्यानंतर उद्योग व्यवसाय करीत प्रपंच चालविण्याऱ्या अशा माता भगिनी – लेकींचा सभा सभारंभात बोलावून सन्मान केला आहे का ? सन्मान राहू द्या पाठमोरे तिच्या बद्दल आपण काही वाईट बोलतो का ? या बद्दलचा मनाचा ठाव ज्याच्या त्याने घ्यावा . एखाद्या स्त्री वर तलाकाचे संकट ओढवले जात असताना समाजातील जी तथाकथीत मोठी माणसं एकत्र येवून निर्णय घेतात ,त्यांची शैक्षणीक आणि धार्मिक शिक्षणाची पात्रता काय ? पोलीसी व्यवस्थेशी यांचा कधी संबध आला आहे का ? हे त्यांना उमजते का ? आणि सुयोग्य न्यायप्रिय निवाडा करता येत नसेल तर एखाद्या स्त्रीचा संसार मोडू शकणाऱ्या न्यायनिवाड्यात ते का सामील होतात. पंचाना, वेगवेगळ्या गावच्या जमातींना न जुमानणाऱ्या , आर्थिक गडगंज लोकासमोर हे लोक हतबल, गलीतगात्र कसे होतात . अशावेळी खरोखरच अन्याय झालेल्या मुलीसाठी अथवा मुलासाठी वेगवेगळ्या गावाहून आलेले ते जमातींचे पंच पोलीस कारवाई करण्यासाठी पीडीत परिवारासह पुढे का येत नाहीत . त्यांच्या पाठीशी का उभे रहात नाहीत, मी मांडतो ते प्रश्न आणि विचार बंडखोर नाहीत मात्र प्रेषितांच्या भूमिकेशी जवळीक साधणारे आहेत . जेवण्यापूर्वी आसपास कोणी उपाशी तर नाही ना ? हे पाहून त्यांच्या पोटाची सोय केल्याशिवाय तुम्ही जेवू नका असे सांगणाऱ्या प्रेषितांच्या ममत्वाच्या विचारांशी, माझ्या विचारांच्या रक्ताचे नाते आहे . ते कुरेश होते . याचा मी केवळ अभिमान सांगत नाही तर माझ्या समाजातील एक धाडसी, अत्यंत हुशार मुलगी *”अफशा फारूक कुरेशी , “अच्छी तालीम”* मिळाली म्हणून भारतीय मुस्लीम समाजातील पहिली विमान पायलट बनली आहे, याचा अभिमान सांगतो. आपल्या मुलींवर शैक्षणीक सोपस्कराची जबाबदारी सोपविण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याची अपेक्षा करतो .
मुस्लीम मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहीजे आणि मुलीनांही तितकेच चांगले शिक्षण मिळाले पाहीजे तरच ते केवळ आपल्या पारंपारीक व्यवसायावर अवलंबून राहणार नाहीत . जगण्याची प्रत्येक कला ते आत्मसात करतील. भारतीय मुस्लीमांच्या वस्त्र कले बद्दल, चित्रकलेबद्दल , शेरो शायरी, साहित्य निर्मिती बद्दल , रेशमाच्या तलम धाग्याच्या निर्मिती पासून सोने जडीत वस्त्र निर्मिती बद्दल स्वातंत्र पूर्व काळात जो भारतीय मुस्लीम समाज प्रसिद्ध होता . कुंभार कामापासून विणकामा पर्यंत प्रत्येक कला आणि व्यवसायात तो पारंगत होता . आज त्या कलांना जगात किंमत आली आहे . पण स्वातंत्र पूर्व काळात दारीद्रयात राहूनही ज्यांनी ही श्रीमंत कला जिवंत ठेवली ,त्यांच्या आजच्या वंशजांना, अगदी जगाला गवसणी घालेल असे आधूनिक शिक्षण देवून याच कलेतून आर्थिक दृष्ट्या उम्मतीला *”उन्नत”* बनविणे शक्य आहे . पन्नास टक्के लोकसंख्या असणाऱ्या मुली ,महिला यांच्या कारागिरीला वाव देण्याची गरज आहे . मार्केटींगची तंत्रे शिकवून त्यांच्या कंपन्या उभ्या करण्यासाठी साथ देण्याची गरज आहे . ज्या आत्मीयतेने आपण मशिदी, दर्गे उभारण्यासाठी पैसा उभा करतो . तसाच पैसा शाळा, कॉलेज, अभ्यासिका , प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे उभारण्यासाठी खर्च केला पाहीजे . मुस्लीम समाजात एक मोठा गुण आहे .मृताच्या जनाज्याला खांदा देणे . हातातले काम – धंदे सोडून पळून पळून खांदा देणारे बांधव सर्वत्र मोठ्या संख्येने आढळतील आणि आपण त्याला पुण्य मानतो . पण आज वास्तवात समाजाची अवस्था, मरणासन्न बनली असताना एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून समाजाला शैक्षणीक, आर्थीक आणि व्यावसायीक प्रगत करण्याची गरज आहे . याचा विचार समाजातील सर्व स्तरातून तारतम्याने होईल अशी अपेक्षा बाळगतो .