स्थैर्य, मथुरा, दि.१: मथुरा जिल्ह्यात
मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी वृंदावन पोलिस
आणि एसओजीने उघडकीस आणली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
बलात्कारानंतर अमली पदार्थांचे व्यसन असलेल्या आरोपीने मुलीच्या तोंडात
अंतर्वस्त्र कोंबून ठार मारले. कोतवाली वृंदावनमध्ये वडिलांनी आठ वर्षांची
मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती.
वृंदावन कोतवाली येथील रामनरेती चौकी भागात राहणारी आठ वर्षांची मुलगी,
गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास नातेवाईक महिलेसह लाकडं गोळा करण्यासाठी
शेजारील जंगलात गेली. ती तिथून बेपत्ता झाली होती. रात्री उशिरापर्यंत
पोलिसांनी मुलीच्या शोधात शोध मोहीम राबविली, पण मुलगी काही सापडली नाही.
या प्रकरणात वृंदावन कोतवाली पोलिसांनी मुलगी हरवल्याबाबत तक्रार नोंद केली
होती.
मुलीचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत जंगलात आढळला. वृंदावन कोतवाल
अनुज कुमार व एसओजी प्रभारी धीरज गौतम यांनी या बालिकेच्या हत्येचा तपास
करत या गुन्ह्यात सहभागी झालेल्या महेश, रहिवासी तारौली सामौली कोतवाली
छाता याला अटक केली आहे.