आमटे कुटूंबातला वाद नेमका काय होता व कधी सुरू झाला..?


 

स्थैर्य, दि.१: जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल आमटे-कराजगी यांनी आज आत्महत्या केली. या आत्महत्येचे नेमके कारण उद्याप समोर आले नसले तरी कौटुंबिक गृहकलह आणि नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या आमटे कुटुंबीयांच्या वादाने समाजमाध्यमांमध्ये जागा घेतली होती. समाजमाध्यमे आणि वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांमधून या वादावर भाष्य करणाऱ्या बातम्या वेळोवेळी प्रकाशित होत होत्या.

पण हा वाद नेमका काय होता आणि कधी सुरु झाला होता ?

जेष्ठ समाजसेवक कै. बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी १९४९ मध्ये या आनंदवनाची उभारणी केली. संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना याठिकाणी आश्रय मिळाला.

बाबा आणि साधना आमटे यांनी या रोग्यांची सेवा केली. त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. सोबतच कुष्ठरोग्यांवर उपचार करणारे केंद्र किंवा रुग्णालय होऊ नये, याची ही बाबांनी दक्षता घेतली. कुष्ठरोग्यांच्या श्रमातून औद्योगिक वसाहत उभी करत स्वयंपूर्ण करून जगायला शिकविले.

२००८ मध्ये बाबांच्या निधनानंतर हा कारभार त्यांचा मुलगा विकास आमटे यांच्यावर सोपविला. 

त्यांनी काही काळ कारभार सांभाळल्यानंतर आमटेंची तिसरी पिढी डॉ. दिगंत-अनिकेत आणि डॉ. शीतल-कौस्तुभ यांनी बाबा आमटे यांचे काम हातात घेतले. कौस्तुभ यांची महारोगी सेवा समितीवर नियुक्ती करण्यात आली.

सन २०१६ मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारणी जाहीर झाली. यात डॉ. शीतल आमटे-कराजगी आणि त्यांचे पती गौतम कराजगी यांना स्थान देण्यात आले.

याच दरम्यान कौस्तुभ आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या सहसचिव पदावरून राजीनामा दिला. पुण्यात पाणीप्रश्नावर काम करण्यासाठी आनंदवनातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

अशी झाली वादाला सुरुवात…

यानंतर मागील ५ ते ६ महिन्यांपासून वादाने डोके वर काढले. डॉ. शीतल आणि गौतम कराजगी यांनी कारभार आपल्या हातात घेतल्यानंतर आनंदवनाला कॉर्पोरेट लुक देत असल्याचा आरोप होवू लागला.

आनंदवनातील अनेक उपक्रम नव्या पिढीच्या काळात बंद पडल्याचा आरोपही केला गेला. कुष्ठरुग्णांनी स्वयंपूर्ण व्हावे म्हणून आनंदवनात अनेक उत्पादने तयार व्हायची. त्यांची चांगली विक्रीही होत असे. यामध्ये चाळण्या, गाळण्या, सतरंज्या, चादरी, टॉवेल, बैठकीचे जाजम यांसारख्या उत्पादनांचा समावेश होता.

मात्र आता ही उत्पादने नाहीशी झाली आहेत. नव्या व्यवस्थापनाने जुने पॉवरलूम मोडीत काढत कोटय़वधी रुपये खर्चून नवे आधुनिक पॉवरलूम आणले. असा दावा या बातमीमध्ये करण्यात आला.

सोबतच १९६७ मध्ये बाबांनी सुरु केलेली निशुल्क श्रमसंस्कार छावणी (शिबीर) याला ही नव्या पिढीने शुल्क आकारायला सुरुवात केली, त्यामुळे तरुणाईचा ओघ आटत गेला. तसेच आनंदवनचा मित्रमेळावा ही बाबांच्या निधनानंतर झाला नाही असा ही दावा लोकसत्ताच्या बातमीमध्ये केला गेला.

आनंदवनातील शेती बाबत ही आरोप केला होत होता. ही शेती ठेक्याने आंध्रमधील शेतकऱ्यांना करायला दिली जाते. शासनाने ही शेती आनंदवनला दिली ती कुष्ठरुग्णांना आत्मनिर्भर होता यावे म्हणून. नियमाप्रमाणे ती ठेक्याने देता येत नाही. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. असे म्हंटले होते.

यानंतर आनंदवनातील हा वाद पोलीस ठाण्यात गेला.

नवी कार्यकारिणी आपल्या पद्धतीने काम करत असतानाच आनंदवनात राहणाऱ्या दोघांनी नाराजी व्यक्त करत नव्या कार्यकारिणीवर आक्षेप घेणे सुरू केले.

यात डॉ. विकास आमटे यांचा सहाय्यक आणि आनंदवनचे माजी सरपंच राजू सौसागडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आनंदवन आश्रमाच्या व्यवस्थापनाकडून आपल्याला हीन दर्जाची वागणूक मिळत असून आपला छळ होत आहे. असा आरोप त्यांनी केला.

नव्या व्यवस्थापनाने ऑफिसमध्ये बोलावून घेत आपला अपमान केला. तसेच सर्व जबाबदाऱ्या काढून घेत घर खाली करायला लावले असा ही आरोप केला. त्यामुळे सौसागडे यांनी नव्या प्रशासनाविरोधात दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) अन्वये तक्रार केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!