मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’चे ९९ टक्के काम पूर्ण; १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार ऐतिहासिक उद्घाटन!


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी.

स्थैर्य, फलटण, दि. 27 एप्रिल : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला (एक्स्प्रेसवे) पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या आणि प्रवाशांची घाटातील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका करणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महाप्रकल्पाचे थाटात उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन मिसिंग लिंकच्या कामाची सविस्तर पाहणी केली. “मी स्वतः येथे येऊन कामाची गुणवत्ता तपासली असून काम अत्यंत समाधानकारक झाले आहे. उर्वरित किरकोळ कामे पुढील काही दिवसांत पूर्ण होतील. वेळेत आणि उच्च दर्जाने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत,” अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.

जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक; अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना:

सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या महाप्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. यातील सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा रस्ता लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून जाणार आहे. हे मोठे आव्हान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) स्वीकारून यशस्वीपणे पेलल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

अपघात शून्यावर येणार, वेळेची आणि इंधनाची बचत:

मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर खंडाळा घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक कोंडी पूर्णपणे बायपास होणार आहे. यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाचा वेळ २० ते ३० मिनिटांनी वाचणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसांना या मार्गावर प्राधान्य दिले जाईल. “या प्रकल्पामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील,” असा ठाम दावा शिंदे यांनी केला. यामुळे इंधनाची बचत आणि प्रदूषणातही लक्षणीय घट होणार आहे.

टोलमध्ये कोणतीही वाढ नाही:

वाहनचालकांसाठी एक मोठा दिलासा देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, “मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. तसेच, खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही टोलवाढ प्रस्तावित नाही.”

बोगद्यात साकारली गडकिल्ले व लेण्यांची प्रतिकृती:

या प्रकल्पामुळे लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी या प्रकल्पातील बोगद्यांना गडकिल्ले आणि कार्ला लेण्याच्या प्रतिकृतीप्रमाणे अत्यंत आकर्षकरीत्या सजवण्यात आले आहे. कामाचा दर्जा उत्तम ठेवून ही शिल्पे खराब होऊ नयेत याची पुरेशी खबरदारी घेण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

२०१९ साली मंजुरी, आता लोकार्पण:

सुमारे ६,७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला २०१९ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच मंजुरी देण्यात आली होती. आता त्यांच्याच उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असल्याने हा एक विशेष योगायोग असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

“भविष्यात समृद्धी महामार्ग, कोकण कोस्टल रोड, वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना जोडून राज्यात ऍक्सेस कंट्रोल रस्त्यांचे जाळे उभारण्यावर सरकारचा भर आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात ७ ते ८ तासांत पोहोचता येईल, अशी सक्षम दळणवळण व्यवस्था आम्ही उभारत आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पाहणी दौऱ्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड तसेच एमएसआरडीसी, ॲफ्कॉन (Afcons) आणि नवयुग (Navayuga) कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!