
फलटणच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील १०० विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संदेश देण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत १०० विद्यार्थ्यांनी स्वतः गणेशमूर्ती तयार करून आगामी गणेशोत्सवात त्याच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प केला.
१०० विद्यार्थ्यांनी स्वतः घडवल्या गणेशमूर्ती
गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम राबविणारे कलाशिक्षक बापूराव सूर्यवंशी आणि मूर्तिकार राजेश बोथेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कार्यशाळेला प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर आणि विजय पाटील उपस्थित होते. बोथेकर यांनी या उपक्रमाबद्दल शाळेचे कौतुक केले.
पर्यावरण संवर्धनाचा विद्यार्थ्यांमधून संदेश
विद्यार्थ्यांवर लहानपणापासून पर्यावरण संवर्धनाचे संस्कार होणे गरजेचे असून, या उपक्रमातून त्यांच्या कलागुणांसोबत पर्यावरणाविषयी सामाजिक जाणीव निर्माण होत असल्याचे प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी सांगितले. शाडू मातीच्या वापरामुळे जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्तींमधून समाजात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश जाईल, असे पर्यवेक्षक विजय पाटील यांनी सांगितले.
