तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलचा दबदबा

मुधोजीचे १४ व १७ वर्षांखालील क्रिकेट संघ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र तर १९ वर्षाखाली संघ उपविजेता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा अभियांत्रिकी महाविद्यालय ठाकूरकी, ता. फलटण येथे दिनांक ०६ व ०७ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडल्या. यामध्ये १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील व १९ वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये १४, १७ व १९ वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) जाधववाडी व श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (एसएससी) जाधववाडी, जि. प. हायस्कूल कुरवली खुर्द, हणमंतराव पवार हायस्कूल फलटण, शिंदेवाडी हायस्कूल आनंदनगर, सरदार वल्लभभाई हायस्कूल (मुली) या संघांनी आपला सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेचे उद्घाटन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र नार्वे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी तालुका क्रीडा ऑफिसचे मुकुंद गायकवाड, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे सचिव सचिन धुमाळ, फलटण तालुका क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, मनोज कदम, डी एन जाधव, अमोल नाळे, सुजीत जमदाडे, प्रितम लोंढे, संदिप ढेंबरे, अमित काळे, कुमार पवार, सुहास कदम, सोमनाथ चौधरी, पंच अविनाश अहिवळे, सागर भंडलकर, रवि दळवी हे उपस्थित होते.

१४ वर्षाखालील झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये मुधोजी हायस्कूल संघाने श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) यांच्यात झाला. मुधोजी हायस्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. यावेळी श्रीमंत शिवाजीराजे संघाने ६ षटकात ६ गाड्यांच्या मोबदल्यात ५० धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरादाखल मुधोजी हायस्कूल संघाने श्रीमंत शिवाजीराजे (सीबीएसई) संघाचा ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात मुधोजी हायस्कूल संघातर्फे शंभूरज टेंबरे याने २० चेंडूत २८ धावा केल्या, तर समर्थ निंबाळकर याने १२ धावा देत ३ विकेट घेतल्या व विजयात सिंहाचा वाटा उचलला.

१७ वर्षाखालील झालेल्या अंतिम सामन्यामध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (एसएससी ) यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना मुधोजी हायस्कूल संघाने ६ षटकांमध्ये १ गड्याच्या मोबदल्यात ६४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीमंत शिवाजीराजे (एसएससी) संघाला ६ षटकांमध्ये ५ गड्यांच्या मोबदल्यात २८ धावाच करता आल्या व हा सामना मुधोजी हायस्कूलने ३६ धावांनी एकतर्फी जिंकला. या सामन्यामध्ये मुधोजी हायस्कूलच्या सोहम सूळ याने २४ चेंडूत ३६ धावांचे योगदान दिले तर अबसार मेटकरी याने ८ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद करत या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

१९ वर्षाखालील झालेल्या अतीतटीच्या अंतिम सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून मालोजीराजे शेती विद्यालय संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. यावेळी प्रथम फलंदाजी करताना मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज संघाने ५ षटकात ३ गडांच्या मोबदल्यात ४० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मालोजीराजे शेती विद्यालयाने २ गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या चेंडू वरती ४ धावांची गरज असताना विजयी चौकार मारून या धावांचा यशस्वी पाठलाग केला. यावेळी मालोजीराजे शेती विद्यालय संघातर्फे हर्षवर्धन कदम याने १५ धावात २ गडी बाद करून १४ धावा काढल्या. त्याला आदित्य गायकवाड याने तुफानी खेळी करत २५ धावा करत शेवटच्या चेंडूवरती ४ धावांची गरज असताना त्याने विजयी चौकार मारत मालोजीराजे संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला व मालोजीराजे संघ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला तर मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हा संघ उपविजेता ठरला.

या विजयाबद्दल विधान परिषदेचे विद्यमान आमदार तथा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र अमॅच्युअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, शाळा तपासणीस दिलीप राजगुडा व फलटण एज्युकेशन नियमक मंडळाचे सर्व सदस्य, प्रशालेचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, ज्युनिअर विभाग उपप्राचार्य ज्ञानदेव देशमुख, माध्यामिक उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, पर्यवेक्षक वसंतराव शिंदे, गोपाळराव जाधव, सौ. सुनिता माळवदे, क्रीडा सचिव सचिन धुमाळ, क्रीडा शिक्षिका धनश्री क्षीरसागर आणि विद्यालयाचे शिक्षक वृंद यांनी १४ व १७ वर्षाखालील क्रिकेट संघाचे व क्रीडा प्रशिक्षक अमोल नाळे व सुजीत जमदाडे, प्रितम लोंढे यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!