खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर किर्गिस्तान देशाच्या दौर्‍यावर; किर्गिस्तानचे राष्ट्रपती सादर जॉपरो यांची घेतली भेट


दैनिक स्थैर्य । दि. 05 ऑक्टोबर 2021 । फलटण । माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा किर्गिस्तान या देशाचा दौरा सुरू आहे. भारत सरकारच्यावतीने या दौर्‍याचे नियोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची गुंतवणूक वाढवावी व त्या देशांमध्ये भारताने गुंतवणूक करून भारत व किर्गिस्तान या देशाचे संबंध दृढ व्हावेत व अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय पातळीवर चालना मिळावी या उद्देशाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकारने पुढील वाटाघाटीसाठी या दौर्‍यासाठी निवड केली आहे. या दौर्‍यादरम्यान कर्गिस्तानचे राष्ट्रपती सादर जॉपरो व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट झाली.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्या देशांमध्ये गेल्यापासून दुग्ध व्यवसाय, साखर व्यवसाय, पॉवर सेक्टर, कृषी क्षेत्र, बँकिंग सेक्टर अशा विविध विषयांवर तज्ज्ञ लोकांशी चर्चा व बैठका केल्या आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून किर्गिस्तानचे राष्ट्रपती सादर जॉपरो यांची व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट झाली.

राष्ट्रपती सादर जॉपरो यांनी भारत व आमच्या देशाचे संबंध पुढील काळात मैत्री पुर्ण राहातील अशी ग्वाही खासदार रणजितसिंह यांना दिली. यावेळी या भेटीदरम्यान किर्गिस्तान चे उपपंतप्रधान अखिलबेग जॉपरो हेही उपस्थित होते. उपपंतप्रधान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल बोलताना खुप आदर व्यक्त केला व आपल्या देशा बद्दलची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना त्यांनी दिली.

खासदार रणजितसिंह नाईक यांनी राष्ट्रपती सादर जॉपरो यांना त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर दोन्ही देशातील कृषी क्षेत्रातील देवाणघेवाण, बँकिंग आणि पॉवर सेक्टर या विषयावर चर्चा केली. लवकरच भारतामध्ये किर्गिस्तानचे शिष्टमंडळ येणार असून भारतातल्या सर्व मोठ्या उद्योगपतींची भेट घेणार आहे. यावेळी या दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होतील अशी ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!