चार महिन्यात पैसे दुप्पट! बारावी पास तरुणाचा देशभरातील 25 हजारांपेक्षा जास्त लोकांना 100 कोटींचा चुना


 

स्थैर्य, नागपूर, दि.२६ : लॉकडाउनच्या काळात एका बाजूला चांगल्या चांगल्या व्यावसायिकांच्या व्यवसायांना धक्का बसला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्याचवेळी अवघ्या बारावी उत्तीर्ण तरुणाने महाराष्ट्रासह देशभरातील 25 हजारपेक्षा जास्त लोकांना श्रीमंतीचे स्वप्ने दाखवत शंभर कोटींचा चूना लावला आहे. सूटबूट घालून नेहमीच चकचकीत राहणाऱ्या विजय गुरनुले नावाच्या या भामट्याला पोलसांनी बेड्या ठोकल्या आहे. 

रियल ट्रेड घोटाळा प्रकरणी विजय गुरनुलेसह दहा आरोपीना अटक करूनही पोलीस आतापर्यंत फक्त एक कोटींची रक्कम हस्तगत करू शकले आहेत. त्यामुळे “झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिये” हे एका चित्रपटातले डायलॉग या भामट्याने वास्तवात उतरवून दाखविला आहे.

विजय गुरनुले हा मेट्रो व्हिसन बिल्डकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सीएमडी आहे. मात्र, या महाभागाने व्यवसायात काही चांगलं करण्याऐवजी लॉकडाऊनच्या काळात 25 हजारपेक्षा जास्त सामान्य कुटुंबाना शंभर कोटींचा चूना लावला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हजारो कुटुंबाना देशोधडीला लावणारा हा भामटा फक्त बारावी उत्तीर्ण आहे. 

लॉकडाऊनमध्ये जवळपास सर्वांचे व्यवसाय अडचणीत आले होते, नोकऱ्या जात होत्या. लोकांच्या उत्पन्नात कमालीची घट होत होती. तेव्हा विजय गुरनुलेच्या मेट्रो व्हिसन बिल्डकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने “रियल ट्रेड” नावाची योजना लोकांच्या घशात उतरविली. लोकांच्या खिशातून एक दोन नाही तर तब्ब्ल शंभर कोटींची गुंतवणूक काढून घेतली. मेट्रो व्हिसन बिल्डकॉन इंडिया ही कंपनी 2015 पासूनच अस्तित्वात आहे. अनेक व्यवसायात हात आजमावणाऱ्या या कंपनीने फेब्रुवारी 2020 मध्ये रियल ट्रेड नावाने गुंतवणुकीची योजना आणली. या योजनेत वार्षिक किंवा मासिक नव्हे, तर दर आठवड्याला परतावा दिला जाईल, असे विजय गुरनुलेने जाहीर केले. 

महाराष्ट्रात आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ; जाणून घ्या तारखा आणि शुभ मुहूर्त

काय होती रियल ट्रेड योजना? 

गुंतवणूकदाराने ठराविक रक्कम गुंतविल्यास त्याला निश्चित रकमेचा परतावा दर आठवड्याला मिळेल. 

दर आठवड्याला परतवा मिळत असल्याने गुंतवलेली रक्कम 3 ते 4 महिन्यात दुप्पट होईल. 

रियल ट्रेड योजनेत 7 उपप्रकार होते. 

9 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 750 परतावा 

21 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 2250 परतावा 

33 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 3185 परतावा 

45 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 5250 परतावा 

57 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 6750 परतावा 

67 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 9500 परतावा 

93 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 12500 परतावा 

या शिवाय मल्टी लेव्हल मार्केटिंग प्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने आणखी गुंतवणूकदार आणले तर त्याला कमिशन मिळणार होतं. 

कोरोना काळात लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यात लोकांना उत्पन्नाचे नवे साधन हवे आहे. त्यांना घर बसल्या गुंतवणुकीची झटपट श्रीमंत करणारी आकर्षक योजना सांगितली, तर लोकं त्याकडे सहज आकर्षित होतील हे गुरनुले आणि त्याच्या टीमने ओळखले. छोट्या छोट्या समूहात लोकांच्या व्हर्चुल मिटींग्स घेत रियल ट्रेड योजनेची माहिती सांगितली. आधीच काम धंदे ठप्प झालेले लोक मोठ्या संख्येने या योजनेकडे आकर्षित झाले. 

जास्त गुंतवणूकदार आणणाऱ्यांचे मेट्रो व्हिसन बिल्डकॉन इंडियाच्या कार्यालयात सत्कार केले जाऊ लागले. त्यांचे फोटो व्हायरल केले जाऊ लागले. पाहता पाहता कंपनीला 25 हजार प्राथमिक गुंतवणूकदार मिळाले. या 25 हजार गुंतवणूकदारांनी जवळपास अडीच लाख आयडी ओपन करत शंभर कोटींची गुंतवणूक गुरनुलेच्या कंपनीत गुंतविली. एप्रिलपासून जूनपर्यंत तर लोकांना दर आठवड्याला परतावे मिळाले. त्यानंतर अडचणी येऊ लागल्या. ऑगस्टपासून परतावे पूर्णपणे बंद झाले. दिवाळीच्या काळात तर कंपनीच्या कार्यालयावर कुलूप ठोकून विजय गुरनुले आणि त्याचे साथीदार पसार झाले. 

पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानुसार या कंपनीने आपलं मायाजाल संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशातील जवळपास प्रत्येक राज्यात विणले होते. व्हर्च्युअल मिटींग्स, त्यात आकर्षक आश्वासने, ज्यांना सुरुवातीच्या आठवड्यात परतावे मिळाले त्यांच्याकडून होणारी माऊथ पब्लिसिटीद्वारे गुरनुलेचं मायाजाल पसरत गेलं. फसवणूक झालेल्यापैकी सर्वाधिक गुंतवणूकदार महाराष्ट्रातील असून त्यांनतर आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बंगाल, उत्तर प्रदेशसह सर्वच राज्यांचा समावेश आहे. रियल ट्रेड योजनेचे शिकार झालेल्यांमध्ये बेरोजगार तरुण, नोकरदार वर्ग, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक, घरघुती बचत गुंतविणाऱ्या महिला यांच्यासह आर्किटेक्ट, वकील, डॉक्टरांसारखे प्रोफेशनल्स यांचाही समावेश आहे. 

अजमल कसाबला जिवंत पकडणा-या तुकाराम ओंबळेंचे स्मारक आजही दुर्लक्षितच

पोलिसांनी या प्रकरणी मेट्रो व्हिसन बिल्डकॉन इंडियाचा मुख्य प्रोमोटर विजय गुरनुलेसह दहा जणांना अटक केली आहे. गुरनुलेच्या नातेवाईकांच्या घरातून 56 लाख तर कंपनीच्या संचालकांच्या विविध बँक अकाउंट मधून 48 लाख अशी सुमारे एक कोटीची रक्कम पोलिसांनी जप्त केली असली तरी गोठल्याची व्याप्ती पाहता जप्तीचा आकडा अत्यल्प आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रयत्न वाढवण्याची गरज आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!