महाराष्ट्रात आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ; जाणून घ्या तारखा आणि शुभ मुहूर्त


 

स्थैर्य, दि.२६: दिवाळी नंतर तुळसी विवाह, देव दिवाळी याचा उत्साह असतो. आज पासून तुळशीच्या लग्नाचे मुहूर्त सुरु होत आहेत. 26 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह करता येईल. तुळशी विवाह म्हणजे घरातील तुळशीचे विष्णूसोबत लग्न लावले जाते. अगदी पारंपारिक पद्धतीने धुमधडाक्यात महाराष्ट्रभर हा सोहळा पार पडतो. गावागावांमध्ये तुळशी विवाहाचा उत्साह असतो. यानिमित्ताने पुन्हा एकदा दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेता येतो. फटाक्यांची आतिषबाजी करता येते. जाणून घेऊया यंदा तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त काय आणि हा सोहळा नेमका कसा साजरा करायचा?

तुळशी विवाह 2020 शुभ मुहूर्त: 

तुळशी विवाह साधारणपणे संध्याकाळी केला जातो. 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.59 ते 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.59 पर्यंत तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त आहे. 

तुळशी विवाह कसा कराल? 

विवाहासाठी तुळशीला एखाद्या नववधूप्रमाणे नटवले जाते. उस तुळशीमागे मामा म्हणून खोवला जातो. समोर विष्णू (कृष्ण) ठेवून दोघांचीही पूजा केली जाते. त्यानंतर दोघांमध्ये आंतरपाट धरुन मंगलाष्टका वाजवल्या जातात. जमलेले लोक अक्षता टाकतात. त्यानंतर विवाहपूर्तीच्या माळा घातल्या जातात. त्यानंतर दिवाळीच्या फराळाची मेजवानी असते. फटाके फोटून आनंद साजरा केला जातो. 

तुळशी विवाहाची कथा: 

वृंदा नावाच्या एका मुलीचे लग्न असूरांचा राजा जालंधरशी झाले होते. तो अतिशय सामर्थ्यवान होता. मात्र तो दुष्ट होता आणि आपल्या शक्तीचा उपयोग तो वाईट कामांसाठी करत असे. त्याची पत्नी वृंदा ही विष्णुची एकनिष्ठ भक्त होती. जालंधरला नष्ट करण्यासाठी वृंदेची पतीव्रता मोडीत काढणे गरजेचे होते. म्हणून भगवान विष्णूने जालंधरचे रूप घेतले आणि तिची पतीव्रता मोडीत काढली. त्यानंतर भगवान शिवाला असूरांचा राजा जालंधरचा पराभव करण्यात यश आले. 

वृंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला शालिग्राम नावाचा दगड बनण्याचा शाप दिला आणि स्वत: ला निर्जन केले. म्हणून भगवान विष्णूने तिला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळेच तुळशी विवाहानंतर तुळशीला देवीचे महत्त्व प्राप्त झाले आणि भगवान विष्णुला तुळस प्रिय आहे, असे मानले जावू लागले. 

घरातील मुलीचे लग्न असल्याप्रमाणे तुळशी विवाह सोहळा महाराष्ट्राच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तुळशीच्या लग्नानंतरच लग्नसराईला सुरुवात होते.

खूप बाेलण्याची इच्छा असलेल्या पवारांनी बाळासाहेबांची कमिटमेंट पाळली


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!