श्रीमंत रामराजे व आमदार दीपक चव्हाण यांचा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारला जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ सप्टेंबर २०२४ | फलटण |विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि फलटण-कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस. टी. आरक्षण अंमलबजावणी करण्याकामी राज्य सरकारला जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून तात्काळ आरक्षण देण्यासाठी जी. आर. काढून तातडीने अधिवेशन बोलावून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात धनगर समाज पिढ्यानपिढ्या मेंढपाळ व्यवसाय करत असून ते पशुपालक आहेत. १९५६ च्या एस.टी.यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर धनगर अशी नोंद आहे. मात्र, देवनागरी लिपीत इंग्रजीमधून धनगरचे स्पेलिंग ‘धनगर’ याऐवजी ‘धनगड’ असे लिहिले आहे. या शब्दाचा शब्दश: अर्थ घेवून गेल्या ६८ वर्षांपासून धनगर समाजाला एस.टी. आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. राज्यात ‘धनगड’ नावाची जमात कुठेच अस्तित्वात नाही.

राज्य सरकारने तात्काळ धनगर समाजाच्या या न्याय मागणीचा विचार करून त्यांच्या हक्काचे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा तात्काळ जी.आर. काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीची सवलत लागू करावी. वेळ पडली तर राज्य सरकारने तातडीचे अधिवेशन बोलवून या अधिवेशनामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी विनंती केली आहे.


Back to top button
Don`t copy text!