
जावळी तालुक्यातील रस्त्यांच्या आणि विकासकामांच्या संदर्भात आयोजित बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीवर तीव्र संताप व्यक्त केला. वन विभाग आणि इतर यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सक्त सूचना त्यांनी दिल्या आहेत.
स्थैर्य, सातारा : जावळी तालुक्यात पाचवड-मेढा-मुनावळे-शेंबडी या रस्त्यांसह विविध विकासकामे सुरू आहेत. मात्र, काही ठिकाणी वन विभागाची जागा असल्याने आणि संबंधित विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करत असल्याने ही कामे रखडली आहेत. “मी आमदार आणि मंत्री आहे, म्हणून मीच सगळं करायचं का? तुमची कामे तुम्ही करायला नको का? उंटावरून शेळ्या हाकायचे बंद करा,” अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे मार्गी लावावीत, अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्या.
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात ‘महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास प्राधिकरणा’च्या (MSIDC) रस्ते कामांमध्ये येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि मंत्र्यांच्या सूचना :
-
वन विभागाला सक्त ताकीद: ज्या ठिकाणी वन विभागाची जागा आहे, तिथले प्रस्ताव तातडीने वन विभागाकडे पाठवा. ‘आज पाठवतो, उद्या बघतो’ हे उद्योग आता थांबवा. वन विभागानेही जनहिताच्या कामांमध्ये आडमुठी भूमिका न घेता परवानग्या तातडीने द्याव्यात. प्रत्येक गोष्टीत अडवणूक करणे योग्य नाही.
-
कास पठार व मुनावळे रस्ता: कास पठार येथे रस्त्याचे रुंदीकरण नसून केवळ आहे तेवढाच रस्ता नव्याने केला जात आहे. तरीही वन विभाग त्याला आडकाठी आणत असल्याबद्दल मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मुनावळे-अंबवडे कळकोशी रस्त्यालाही तातडीने परवानगी देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
-
अतिक्रमण निर्मूलन: मेढा येथे काही अतिक्रमणांमुळे कामात अडथळा येत आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने बंदोबस्त लावून संबंधित विभागाने ही अतिक्रमणे हटवावीत. ‘कोणीही काहीही करेल म्हणून कामे थांबवायची का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
-
नवे प्रस्ताव व आढावा: हुमगाव ते बावधन रस्ता मार्गी लावण्यासाठी कोलेवाडी-सोमर्डी येथे ६०० मीटर बोगदा करण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच करहर येथील विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा विकसित करण्याचा आढावाही घेण्यात आला.
‘मी गावात थांबून शाळा बांधून घेतली…’
कारगाव आणि कात्रेवाडी ही गावे बफर झोनमध्ये येत असून येथील नागरिकांची घरे वन विभागाच्या (फॉरेस्ट) जागेवर आहेत. येथे लोक राहतात, याची जाणीव वन विभागाने ठेवावी. एकतर त्यांना त्याच ठिकाणी रस्ते व सर्व सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी परवानगी द्यावी, किंवा त्यांना पुनर्वसनासाठी पर्यायी जागा द्यावी. पूर्वी वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने येथील शाळा पाडली होती, तेव्हा ‘मी स्वतः तेथे थांबून शाळा बांधून घेतली होती,’ या आठवणीला उजाळा देत ना. शिवेंद्रसिंहराजेंनी वन विभागाच्या एकंदर कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रांताधिकारी आशिष बारकूल, वन विभागाचे अधिकारी अमोल सातपुते, कोयना वन्यजीव विभागाचे उपसंचालक किरण जगताप, सहायक वनसंरक्षक हाके, एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता र. रा. हांडे, कार्यकारी अभियंता संतोष बम्पलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, जावळीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल, मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव मानकुमरे, भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामने आदी उपस्थित होते.

