‘मातोश्री हे मराठी माणसाचे सन्मानाचे स्थान, मातोश्रीचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही- एकनाथ शिंदे


 

स्थैर्य, मुंबई, दि.६: नुकतंच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला उडवण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. दुबईवरून दाऊदच्या हस्तकाने फोन केल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ‘ दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मातोश्रीचे वाकडे करू शकणार नाहीत’, असे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील वांद्रा येथे असलेले खासगी निवासस्थान मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली होती. दुबईवरून मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरुन मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मातोश्रीचे कोणी वाकडे करू शकत नाही. मातोश्री हे मराठी माणसाचे सन्मानाचे स्थान आहे. दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मातोश्रीचे वाकडे करु शकणार नाहीत. दाऊद हा दुसऱ्याचा आश्रय घेऊन राहतो. पोकळ धमक्यांना शिवसेना घाबरत नाही,’ अशी प्रतिक्रीया शिंदे यांनी दिली.

कोणीच धमकी दिलेली नाही – अनिल परब

दरम्यान, ‘मातोश्रीवर एक निनावी फोन आला होता. तो दाऊदचा हस्तक असल्याचे त्याने सांगितले. त्याला फक्त मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. पण, मातोश्री उडवण्याची धमकी दिलेली नाही’, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसेच, कॉलची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, पोलिस सखोल तपास करत असल्याचेही अनिल परब यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!