
थेट WhatsApp वर मिळवा
हवामानातील बदलांमुळे आंब्याच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यंदा कमी पाऊस आणि सतत वाढणाऱ्या तापमानामुळे आंबा बागायतदारांची चिंता कमालीची वाढली आहे.
स्थैर्य,सातारा, दि. ०५ ऑक्टोबर : कमी पाऊस, वाढते तापमान आणि थंडीचे लांबलेले आगमन यामुळे यंदा आंब्याच्या हंगामावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामानातील या सातत्यपूर्ण बदलांमुळे आंब्याला येणाऱ्या मोहरावर परिणाम होत असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
हवामानाचा मोहरावर विपरीत परिणाम
आंब्याच्या झाडांना वेळेवर मोहर येण्यासाठी विशिष्ट प्रमाणात थंडी आणि योग्य हवामानाची आवश्यकता असते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि ऑक्टोबर हिटमुळे तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने झाडांची नैसर्गिक प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मोहर करपण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा थंडीचे आगमन काहीसे लांबण्याची शक्यता आहे. थंडी उशिरा सुरू झाल्यास आंब्याचा मोहर येण्याचा कालावधी लांबणीवर पडेल, ज्याचा थेट परिणाम फळांच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर होईल. या संकटामुळे बागायतदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.



