नोंदणीकृत नसलेल्या दिंडीसाठी विशेष व्यवस्था करा : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२३ । फलटण । श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा काही दिवसातच प्रस्थान करणार आहे या पालखी सोहळ्यामध्ये नोंदणी नसलेल्या दिंड्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे नोंदणीकृत नसलेल्या दिंडीसाठी प्रशासनाने व पालखी सोहळा व्यवस्थापन समितीने विशेष व्यवस्था करावी असे निर्देश महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिले.

फलटण येथील पालखी तळाची पाहणी करताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, सातारचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार समीर यादव, सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये नोंदणीकृत दिंड्यांसोबतच नोंदणी न केलेल्या दिंड्यांची संख्या ही लक्षणीय असते. पालखी रथाच्या पुढे व पाठीमागे हजारो नोंदणी नसलेल्या दिंडी मार्गस्थ होत असतात; अशा दिंड्यांच्या नोंदणीसाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेत तातडीने जास्तीत जास्त दिंड्यांची नोंदणी करावी. यासोबतच रथाच्या पाठीमागूनच नोंदणी नसलेल्या दिंड्या मार्गस्थ करण्यासाठी पालखी पालखी सोहळा समितीने व प्रशासनाने संयुक्तरीत्या कामकाज करावे, असेही यावेळी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी स्पष्ट केले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांना फलटणमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, यांच्याकडून आढावा घेऊन सूचना दिल्या.


Back to top button
Don`t copy text!