तापमान वाढीचा इशारा; नोव्हेंबरमध्येही उन्हाचा फटका बसणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

प्रशांत महासागरात निर्माण झालेली ‘एल निनो’ स्थिती आणि हवामान बदलाच्या प्रभावामुळे यंदाच्या नोव्हेंबर महिन्यातही देशासह महाराष्ट्रात उन्हाचा कडाका कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०२ नोव्हेंबर : ऑक्टोबर महिन्यातील तीव्र उन्हाच्या झळांनंतर आता नोव्हेंबर महिन्यातही नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार असून, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीच्या तीव्रतेमुळे देशासह महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनच्या निरोतानंतर हिवाळ्याच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी ही चिंतेची बातमी ठरत आहे.

हवामानातील बदल

हवामान विभागाने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ‘एल निनो’चा प्रभाव कायम राहणार आहे. यामुळे उत्तर भारतासह देशाच्या बहुतांश भागात तापमान वाढण्याची शक्यता असून, महाराष्ट्र आणि गुजरातसह पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशांना उष्णतेचा मोठा तडाखा बसू शकतो. सध्या राज्यातील किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून, आगामी काही दिवसांत त्यात एक ते दोन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान

यंदाच्या हंगामात मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे आधीच अनेक भागांमध्ये ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून उकाड्यात मोठी वाढ झाली होती. आता नोव्हेंबरमध्येही थंडी लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने रबी पिकांवर आणि शेती उत्पन्नावर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, जागतिक तापमानवाढीमुळे नैसर्गिक हवामान चक्रावर परिणाम होत असून, आगामी काळात नागरिकांना अधिक तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!