लेक लाडकी योजनेच्या अर्जासाठी घरबसल्या सोय; १ लाख १ हजार रुपयांचा लाभ मिळवण्याचा मार्ग सुकर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्रातील मुलींच्या शिक्षणाला आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या लोकप्रिय ‘लेक लाडकी’ योजनेच्या अर्जाची प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली असून, पात्र नागरिकांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०२ नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत पात्र मुलींना जन्मापासून ते वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विविध टप्प्यांतून एकूण १ लाख १ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात जमा केले जाते. यापूर्वी या योजनेचा अर्ज करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन झाल्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून कागदपत्रे अपलोड करण्यापासून ते अर्जाची सद्यस्थिती तपासण्यापर्यंतची सर्व कामे डिजिटल माध्यमातून करता येणार आहेत.

योजनेचे टप्पे आणि निकष

या योजनेंतर्गत लाभार्थी मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, पहिलीत प्रवेश घेतल्यावर ६ हजार रुपये, सहावीत प्रवेश घेतल्यावर ७ हजार रुपये, अकरावीत प्रवेश घेतल्यावर ८ हजार रुपये आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपयांचा अंतिम निधी दिला जातो. पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारक आणि वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असणारी महाराष्ट्रातील कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरतात.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!