बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी २२ प्रकारच्या वस्तूंचा शैक्षणिक संच; राज्य सरकारचा मोठा निर्णय

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पहिल्या दोन पाल्यांसाठी ‘मूलभूत वस्तू संच सहाय्य योजना’ राबवण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, यात एकूण २२ प्रकारच्या शैक्षणिक वस्तूंचा समावेश असलेला संच उपलब्ध करून दिला जाणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०२ नोव्हेंबर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत आणि सक्रिय असणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कामगार विभागाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, पात्र कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना शालेय साहित्याचा संच मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे हजारो कामगार कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

शैक्षणिक साहित्यात कोणत्या वस्तू असणार?

या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी उपयुक्त असलेल्या एकूण २२ प्रकारच्या वस्तूंचा संच दिला जाणार आहे. यामध्ये पाण्याची बाटली, थर्मास, टिफिन बॉक्स, छत्री, रेनकोट, परीक्षेसाठी पॅड, १८ लॉंग बुक, ८ ड्रॉइंग बुक, बॉलपेन बॉक्स, दोन पेन्सिल बॉक्स, भूमिती कंपास, दोन ऑईल पेस्टल्स, पोस्टर कलर, ब्रश संच, दोन प्लास्टिक पट्ट्या, सोलर लॅम्प, कॅल्क्युलेटर, फोल्डिंग अभ्यास टेबल, दोन मार्करसह व्हाईट बोर्ड, गजराचे घड्याळ, शाळेची बॅग आणि किट बॅग अशा एकूण ४९ नगांचा समावेश आहे.

पात्रता आणि खर्चाची तरतूद

या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत आणि सक्रिय असलेल्या कामगारांच्या पहिल्या दोन मुलांनाच मिळणार असून, विद्यार्थी इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकत असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी लागणारा संपूर्ण खर्च मंडळाकडे जमा असलेल्या उपकर निधीतून भागवला जाणार असून, यामुळे कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला मोठा हातभार लागेल.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!