
थेट WhatsApp वर मिळवा
एसटी महामंडळातील ८३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या डिसेंबरच्या वेतनासाठी १६५ कोटींचा तुटवडा निर्माण झाला असून, सरकारने तातडीने निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्थैर्य,सातारा, दि. १८ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनावर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील महिन्याचे वेतन आणि संबंधित देणी भागवण्यासाठी महामंडळाला सुमारे १६५ कोटी रुपयांचा निधी कमी पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा, यासाठी राज्य सरकारने आगामी पुरवणी मागण्यांमध्ये तातडीने भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
अर्थसंकल्पीय तरतुदीतील केवळ ३९१ कोटी शिल्लक
राज्य सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात एसटीच्या सवलत मूल्य प्रतिपूर्तीसाठी ३ हजार ६७८ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, या निधीपैकी आता केवळ ३९१ कोटी रुपयेच शिल्लक राहिले आहेत. दुसरीकडे, महामंडळाला एका महिन्याचे वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, भविष्य निर्वाह निधी, उपदान निधीतील नियोक्त्याचे अंशदान आणि वेतन फरकाचा हप्ता भागवण्यासाठी दरमहा ५५५.९५ कोटी रुपयांची आवश्यकता असते. तसेच, मागील महिन्यात महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ झाल्याने महामंडळावर दरमहा ४.९० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे.
सवलत प्रतिपूर्ती घटल्याने आर्थिक ताण वाढला
राष्ट्रीय सामायिक वाहतूक कार्ड (एनसीएमसी) स्मार्ट कार्डची सक्ती केल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात एसटीला मिळालेली सवलत मूल्य प्रतिपूर्तीची रक्कम घटून ३०५ कोटी रुपयांवर आली आहे. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात कमी आकडा असल्याकडे बरगे यांनी लक्ष वेधले आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेले भविष्य निर्वाह निधी आणि उपदानाचे पैसेही संबंधित संस्थांकडे जमा होऊ शकलेले नाहीत. वेतनास विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांसमोर घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि कर्जाचे हप्ते भरण्याचे मोठे संकट उभे राहील, त्यामुळे शासनाने तातडीने निधी एसटीच्या खात्यात वर्ग करावा, अशी मागणी करण्यात आली आहे





