महाराष्ट्र राज्य सहकारी संघात १११ जागांसाठी मोठी भरती; १ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित अंतर्गत राज्यातील विविध कार्यालयांसाठी १११ कंत्राटी पदांची भरती जाहीर झाली आहे. पात्रता, मानधन आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

स्थैर्य, सातारा, दि. १८ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे अंतर्गत राज्यातील मुख्य कार्यालय व संलग्न कार्यालयांमध्ये १११ रिक्त पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर करण्यात आली आहे. सहकार प्रशिक्षण निदेशक, कनिष्ठ लिपिक, संगणक टेक्निशियन, शिपाई आणि स्वच्छक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १ डिसेंबर आहे.

पदांचा तपशील आणि मानधन

या भरती मोहिमेत कनिष्ठ लिपिकच्या २७ जागा, शिपायाच्या १८ जागा, संगणक टेक्निशियन व स्वच्छक प्रत्येकी १ जागा तसेच सहकार प्रशिक्षण निदेशक पदाच्या उर्वरित जागा ११ महिन्यांच्या करार पद्धतीने भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ठराविक सेवा शुल्क दिले जाईल. यामध्ये स्वच्छक व शिपाई पदासाठी १२ हजार रुपये, कनिष्ठ लिपिकासाठी १५ हजार रुपये, संगणक टेक्निशियनसाठी २० हजार रुपये, तर सहकार प्रशिक्षण निदेशक पदासाठी २० हजार रुपये मानधनासह दरमहा ३ हजार ६०० रुपये फिरती भत्ता दिला जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

सहकार प्रशिक्षण निदेशक पदासाठी कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी आणि बी.एड. किंवा सहकारातील पदविका आवश्यक आहे. संगणक टेक्निशियनसाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा, तर कनिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी व संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. शिपाई पदासाठी दहावी आणि स्वच्छक पदासाठी सातवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय १८ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया आणि संपर्क

उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असून, नियुक्तीनंतर ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर २ लाख रुपयांचा सिक्युरिटी बाँड आणि हमीपत्र देणे बंधनकारक राहील. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, ५, बी. जे. रोड, पुणे – ४११००१ या पत्त्यावर किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!