
थेट WhatsApp वर मिळवा
अमूलपाठोपाठ आता गोकुळ दूध संघही दुधाचे दर वाढवण्याच्या तयारीत आहे. विक्री दरात प्रतिलिटर ४, तर खरेदी दरात २ रुपये वाढीचा प्रस्ताव असून शनिवारपासून नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.
स्थैर्य,सातारा, दि. १८ नोव्हेंबर : अमूल आणि इतर खासगी दूध कंपन्यांनी दरवाढ केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ देखील दुधाच्या दरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. गोकुळच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपये, तर दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मुंबईतील वितरक आणि प्रमुख नेत्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत या दरवाढीवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार असून, शनिवारपासून (दि. २१) नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता
दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील दूध उत्पादनात घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमूलसह राज्यातील अन्य खासगी व सहकारी दूध संघांनी गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी-विक्री दरात यापूर्वीच वाढ केली आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड होऊन आठ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांनी संचालक मंडळासोबत दरवाढीबाबत प्राथमिक चर्चा केली असून, अंतिम दरांबाबत प्रमुख नेत्यांशी विचारविनिमय करून दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाणार आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांच्या खिशाला झळ
या संभाव्य दरवाढीनुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ मिळणार असल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे, मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसह राज्यभरातील ग्राहकांना गोकुळच्या दुधासाठी प्रतिलिटर ४ रुपये अधिक मोजावे लागणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे.





