सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; १८ कॅरेट सोनं थेट १ लाखांच्या खाली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

लग्नसराईपूर्वी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, १८ कॅरेट सोन्याचा दर एक लाख रुपयांच्या खाली उतरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १९ नोव्हेंबर : दिवाळीनंतर आणि तुळशी विवाहाच्या मुहूर्तापूर्वीच सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने दागिने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी (दि. १९) बाजार उघडताच मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण नोंदवली गेली असून, १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम एक लाख रुपयांच्या खाली उतरला आहे. गेल्या महिनाभरात सोन्याच्या दरात सुमारे १६ हजार रुपये, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो ४५ हजार ५०० रुपयांहून अधिक घट झाली आहे.

२४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे ताजे दर

गुडरिटर्न्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईसह प्रमुख शहरांत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १ लाख ३३ हजार २५० रुपयांवर आला आहे. तर दागिन्यांसाठी सर्वाधिक पसंती असलेल्या २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २२ हजार १४० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ९९ हजार ९३० रुपयांवर खाली आला आहे. दुसरीकडे, बुलियन आकडेवारीनुसार २४ कॅरेट सोने १ लाख ३० हजार ४६० रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदी १ लाख ६१ हजार ४९० रुपये प्रतिकिलो दराने व्यवहार करत आहे.

दर घसरण्यामागची प्रमुख कारणे आणि ग्राहकांना संधी

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमधील संभाव्य बदल, डॉलरचे वाढते मूल्य आणि अमेरिकी बॉण्ड्सवरील वाढता परतावा यामुळे गुंतवणूकदार सोने-चांदीतून पैसे काढून इतर पर्यायांकडे वळत आहेत. त्यामुळे जागतिक आणि देशांतर्गत सराफा बाजारात दरांवर दबाव निर्माण झाला आहे. पुढील चार दिवस तुळशी विवाहाचे शुभ मुहूर्त असल्याने आणि लग्नसराईचा हंगाम तोंडावर असल्याने या दरवाढीतील घसरणीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोने-चांदी खरेदीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!