राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून इशारा

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १४ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. मुंबईसह उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. गेल्या २४ तासांत उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही भागांत ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने सागरी किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शेतीपिकांना दिलासा पण गणेशोत्सवात चिंता

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या भागात या पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या आगमनादरम्यान पाऊस सुरू झाल्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि मूर्तिकारांची काही प्रमाणात तारांबळ उडाली आहे. पुढील २४ ते ४८ तासांत मुंबई आणि ठाणे परिसरातही मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!