
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यात सिंचन, घरगुती आणि औद्योगिक वापराच्या पाण्यासाठी सुधारित दर लागू केले आहेत.
स्थैर्य,सातारा, दि. १४ सप्टेंबर : राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सिंचन, घरगुती तसेच औद्योगिक वापराच्या पाण्यासाठी नवीन सुधारित दर लागू केले आहेत. या निर्णयामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या आणि औद्योगिक पाणीपट्टीत मोठी वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
शेती आणि नगदी पिकांना दरवाढीचा फटका
नवीन दररचनेनुसार प्रवाही सिंचनासह धरणातील पाण्यावर आधारित शेतीसाठी जलशुल्कात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. विशेषतः ऊस, केळी, कापूस, फळबागा आणि भाजीपाला यांसारख्या जास्त पाणी लागणाऱ्या नगदी पिकांच्या पाणीपट्टीत वाढ झाली आहे. खते, बियाणे आणि मजुरीच्या वाढत्या खर्चाने आधीच अडचणीत सापडलेल्या बळीराजावर या निर्णयामुळे अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
घरगुती व औद्योगिक पाणीपट्टीही महागणार
केवळ शेतीच नव्हे तर नागरी भागातील घरगुती पाणीपुरवठा आणि औद्योगिक क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे दरही सुधारित करण्यात आले आहेत. प्राधिकरणाच्या नियमांनुसार पाणीपट्टीच्या दरात दरवर्षी निश्चित टक्केवारीनुसार वाढ होणार आहे. यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांच्या घरगुती पाणीपट्टीत वाढ होऊन महागाईचा ताण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.