राज्यात पॉक्सो गुन्ह्यांमध्ये वाढ; बाल सुरक्षेसाठी ‘अर्पण’ची मोठी जनजागृती मोहीम, विद्या बालन यांचाही सहभाग

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (NCRB) अहवालानुसार, महाराष्ट्रात पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये ९.२ टक्क्यांनी वाढ झाली असून वर्षभरात ९,४३२ प्रकरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी ‘अर्पण’ या स्वयंसेवी संस्थेने १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान देशव्यापी ‘बाल सुरक्षा सप्ताह २०२६’ मोहीम हाती घेतली असून अभिनेत्री विद्या बालन या अभियानाच्या सदिच्छादूत म्हणून सहभागी झाल्या आहेत.

स्थैर्य, सातारा,दि. १७ नोव्हेंबर : राज्यात लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि समाजात कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘अर्पण’ संस्थेने पाऊल उचलले आहे. यापूर्वी राज्यात ८,६३९ गुन्हे नोंदवले गेले होते, मात्र नव्या अहवालानुसार हा आकडा ९,४३२ वर पोहोचला असून यामध्ये एकट्या मुंबईतील १,४१६ प्रकरणांचा समावेश आहे. या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी संस्थेने ‘रुक जाओ वरना पॉक्सो पकड लेगा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे.

कायद्याचा सज्जड इशारा आणि समाजाची जबाबदारी

मुलांकडे अयोग्य नजरेने पाहणे, अनुचित स्पर्श करणे किंवा मुलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढणे, जवळ ठेवणे व पाठवणे हे गंभीर गुन्हे असल्याचा स्पष्ट इशारा या मोहिमेतून देण्यात येत आहे. याप्रसंगी बोलताना संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापडिया यांनी गप्प न राहता वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त केली. तसेच, प्रत्येक मुलाला भयमुक्त वातावरणात वाढण्याचा हक्क असून पालकांनी व प्रौढांनी मुलांना मोकळेपणाने बोलता येईल असे सुरक्षित वातावरण निर्माण करावे, असे आवाहन अभिनेत्री विद्या बालन यांनी केले आहे. या मोहिमेच्या प्रचारासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने शाळा, मेट्रो आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती केली जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!