ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांसाठी मोठा निर्णय; ६,८४० कोटींच्या निधीची शिफारस

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, नव्या वसतिगृहांचे बांधकाम आणि भटक्या जमातींच्या विशेष शिबिरांसाठी ६,८४० कोटींच्या निधीची शिफारस मंत्रिमंडळ उपसमितीने केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १९ नोव्हेंबर : राज्यातील अठरापगड जाती आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये तब्बल ६ हजार ८४० कोटी रुपयांच्या निधीची शिफारस करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि अतुल सावे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

शिष्यवृत्ती, महाज्योती आणि वसतिगृह उभारणीला गती

केंद्र सरकारच्या एनएसपी (NSP) पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी १ हजार ८०० कोटी रुपये आवश्यक असताना सध्या केवळ ८३ कोटींची तरतूद असल्याने हा निधी तातडीने वाढवण्यावर बैठकीत भर देण्यात आला. तसेच ‘महाज्योती’ संस्थेसाठी ७०० कोटी रुपयांचा निधी देण्यासह पुण्यातील प्रस्तावित संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यात १०० आणि विभागीय स्तरावर २५० क्षमतेची पर्यावरणपूरक व सौरऊर्जेवर आधारित मुला-मुलींची वसतिगृहे उभारण्याचे काम मार्चपासून सुरू केले जाणार असून, गोरेगाव येथील न्यूझीलंड वसतिगृहातील ८० खोल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाला देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जानेवारीत भटक्या जमातींसाठी ५०० विशेष शिबिरे

विमुक्त जाती व भटक्या जमातींमधील (व्हीजेएनटी) ४३ जातींच्या नागरिकांना हक्काची ओळख मिळवून देण्यासाठी ६, ७ आणि ८ जानेवारी रोजी राज्यभरात सुमारे ५०० विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमधून पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के जन्मदाखले आणि आधार कार्डचे वितरण केले जाईल, ज्यासाठी प्रत्येक महसूल मंडळाला १० हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच, पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘ए-कॅप’ची (A-CAP) फाइल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

 

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!