दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । फलटण । कोरोनामुळे राज्यात रक्ताचा खुप मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत सलग 3 दिवस महारक्तदान शिबीर आयोजित करुन 700/800 बाटल्या रक्त संकलनाची संयोजकांची योजना प्रेरणादायी आणि निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
आर्ट ऑफ लिव्हिंग, रक्तवीर संघटना, सद्गुरु संस्था समूह, संभाजी ब्रिगेड आणि दै. सकाळ यांच्या संयुक्त सहभागाने महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित महारक्तदान शिबीराचे उदघाटन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते फित कापून समारंभपूर्वक करण्यात आले.
यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री आ. महादेव जानकर, सद्गुरु संस्था समुहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, आयुर उद्योग समुहाचे संस्थापक दिगंबर आगवणे, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, रासपचे खंडेराव सरक व त्यांचे सहकारी, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव तथा नगरसेवक सचिन बेडके, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, नगरसेवक अजय माळवे, बजरंग खटके, भाजप तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, प्रा. रमेश आढाव, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष नानासाहेब इवरे, राजेंद्र पाटोळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
संभाव्य कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी शासना बरोबर आपण सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यासाठी गर्दी टाळा, मास्क, सॅनिटायझर वापरा आणि मुख्यतः कोरोना चाचणी करुन घ्या, बाधीत आढळल्यास गृह नव्हे संस्थात्मक विलगीकरणास प्राधान्य द्या असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
संपूर्ण जग व भारत देशाबरोबरच महाराष्ट्रावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले असून विशेषत: दुसरी लाट महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर आली आता जरी ती हळूहळू कमी होऊ लागली असली तरी जर नागरिकांनी प्रशासनाने घालुन दिलेले नियम/निकष सांभाळले नाहीत तर लवकरच तिसर्या लाटेचे संकट महाराष्ट्रातील जनतेवर येवू शकते असे सांगून तरुण वर्गाने रक्तदान शिबीरे आयोजित करुन देशाची रक्ताची गरज भागवावी असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, कोरोना महामारी संपविण्यासाठी कोणतेच शासन पुरे पडू शकत नाही. त्यासाठी जनतेने सामूहिकरीत्या प्रयत्न करुन कोरोनाला थोपविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. रक्तदानामुळे आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो त्यासाठी या रक्तदान मोहिमेमध्ये सर्व तरुणांनी पुढे येण्याची गरज असून आपण देखील या महारक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करणार आहोत.
माजी मंत्री आ. महादेव जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही जवळपास 5 हजार रक्त बाटल्यांचे संकलन केले आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या उपक्रमात सर्वांनीच ताकदीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेष करुन फलटण तालुक्यावर आपले विशेष प्रेम असल्यामुळे फलटण तालुक्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून 27 लाख रुपये किमतीची कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणार असल्याचे आ. जानकर यांनी सांगितले.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्ताविकात अरविंद मेहता यांनी महारक्तदान शिबीर सलग 3 दिवस चालणार असून या शिबीरामध्ये जवळपास 700/800 बाटल्या रक्त संकलित करण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करतानाच सकाळ पासून दोन तासांमध्ये जवळपास 180 रक्त बाटल्यांचे संकलन झाल्याचे निदर्शनास आणून देत मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली असल्याने उद्दिष्ट पूर्ती सहज शक्य होईल याची ग्वाही दिली. फलटणच्या परंपरेला साजेशा पद्धतीने सर्व समाज घटक विशेषतः राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र बोलावून शिबीराचे उदघाटन व पूर्तता करण्याचा संयोजकांचा प्रयत्न प्रेरणादायी आहे. महारक्तदान शिबीर आयोजन, संयोजन, यशस्वीतेसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग, रक्तवीर संघटना, सद्गुरु संस्था समूह, दै. सकाळ व संभाजी ब्रिगेड या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला असल्याचे मेहता यांनी सांगितले.
महारक्तदान शिबीर आयोजन करण्यासाठी ड. ऋषिकेश बिचुकले, उत्तम चोरमले, दीपक मोहिते, अमर चोरमले, नितीन शेवते, ज्ञानेश्वर घाडगे, आशिष काटे, सनी निकम, विनीत शिंदे, संदीप धुमाळ, आप्पा सोनवलकर, सुरज चोरमले व इतर अनेक तरुणांचे सहकार्य लाभले.