माढा लोकसभेत भाजपा विरुद्ध रासपा अशी लढत होणार?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 11 मार्च 2024 | फलटण | लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. महाराष्ट्रामधील बऱ्याच मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवारांनी आपले प्रचार सुरू सुद्धा केले आहेत. तरीसुद्धा माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये अजून महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांच्यातील अंतर्गत तिढा काही सुटत नाही असे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून कोणता उमेदवार निवडून जातो ? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे करीत आहेत. सन 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार शरदचंद्रजी पवार यांनी माढा लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2014 साली झालेल्या निवडणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर सन 2019 साली तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत भारतीय जनता पार्टीची माढा लोकसभेची उमेदवारी मिळवली व प्रचंड बहुमताने माढा लोकसभेवर रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून गेले. ज्या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात शरदचंद्रजी पवार यांची एक हाती पकड होती. त्या मतदारसंघाला सुरुंग लावत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे 2019 साली निवडून आले.

सन 2019 साली झालेल्या निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांचा गट सक्रिय होता. तत्कालीन माजी राज्यसभा खासदार रणजितसिंह मोहिते पाटील हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत कार्यरत होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली.

परंतु त्यानंतर खासदार निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यात पूर्वीसारखे सख्य राहिलेले दिसून येत नाही. बऱ्याच जाहीर कार्यक्रमांमध्ये सुद्धा खासदार निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष सातारा व सोलापूर जिल्ह्याला बघायला मिळालेला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आगामी माढा लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर आपण लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी नक्की कोणाला उमेदवारी जाहीर करते? याकडे संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

यासोबतच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर यांनी सुद्धा आगामी लोकसभा निवडणूक आपण माढा लोकसभा मतदारसंघांमधून प्रचंड ताकतीने लढवणार आहोत. यामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्ष अशीच थेट लढत होणार आहे; असे सुद्धा त्यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर माढा लोकसभेवर निवडून जाण्यासाठी महादेव जानकर यांनी चांगलीच कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महादेव जानकर यांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होण्यासाठी ऑफर दिली असून त्यांना माढा मतदारसंघ सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत त्यांनी विधिमंडळात, अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर व अन्य ठिकाणी गाठीभेटी घेत विजयसिंह मोहिते पाटलांचा आशीर्वाद मिळवण्यामध्ये महादेव जानकर यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. जर मोहिते पाटील कुटुंबीयांमध्ये माढा लोकसभेचे उमेदवारी मिळाली नाही; तर महादेव जानकर यांना मोहिते पाटील गट मदत करतील असा कयास सुद्धा बांधला जात आहे.

महायुतीचा घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुद्धा माढा लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची उमेदवारीची मागणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आलेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात कार्यरत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तीन आमदार आहेत. त्यामुळे आगामी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी; अशी आग्रही मागणी श्रीमंत रामराजे यांच्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. या मागणी दरम्यान जर आगामी लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली नाही; तर कार्यकर्ते काय करतील हे सांगू शकणार नाही; असेही स्पष्ट मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभेचे आचारसंहिता जाहीर होईल. परंतु अद्यापही माढा लोकसभा मतदारसंघाचा महायुती व महाविकास आघाडी मधील तिढा अजून काही सुटत नसल्याचे दिसून येत आहे.


Back to top button
Don`t copy text!