लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात पशुपालकांच्या खात्यांवर २५.३१ कोटी रुपये जमा – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले,अशा पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २५.३१ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 26.11.2022 अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3775 संसर्गकेंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 309064 बाधित पशुधनापैकी एकूण 229659 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 21265 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 138.77 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 99.17 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे श्री. सिंह यांनी सांगितले.

रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले आहे. या दोन्ही पद्धती लंपी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना श्री. सिंह यांनी दिल्या  आहेत.

लसीकरण न केलेल्या आणि लंपी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण  न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या उक्त नमूद वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पुर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहन श्री. सिंह यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!