
थेट WhatsApp वर मिळवा
केंद्र सरकारने १ ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार ई-केवायसी न करणाऱ्या एलपीजी ग्राहकांचे अनुदानित सिलिंडर बुकिंग रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
स्थैर्य,सातारा, दि. २० सप्टेंबर : देशातील घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून सवलतीच्या (अनुदानित) दरात मिळणाऱ्या घरगुती एलपीजी रिफिलसाठी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन (e-KYC) अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांनी ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना १ ऑक्टोबरपासून अनुदानित सिलिंडर बुक करता येणार नाही.
अनुदान गैरवापराला बसणार आळा
बायोमेट्रिक आधार पडताळणीच्या माध्यमातून व्यावसायिक गैरवापर रोखणे, दुबार गॅस कनेक्शन रद्द करणे आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत थेट अनुदान पोहोचवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. देशातील सुमारे २७.४३ कोटींपेक्षा जास्त (८९.९ टक्के) ग्राहकांनी ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्या ग्राहकांनी ऑथेंटिकेशन आधीच पूर्ण केले आहे, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
ई-केवायसी करण्यासाठी घरबसल्या पर्याय उपलब्ध
ज्या ग्राहकांची ई-केवायसी अजून बाकी आहे, त्यांचे गॅस कनेक्शन बंद होणार नाही, मात्र त्यांना अनुदानाचा लाभ मिळणार नाही. ग्राहक गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉयकडून ऑन द स्पॉट, गॅस एजन्सीच्या दालनात जाऊन किंवा इंडियनऑइल वन (Indane), हॅलो बीपीसीएल (Bharatgas) आणि एचपी पे (HP Gas) या मोबाईल ॲप्सद्वारे स्वतः घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करू शकतात. ऑथेंटिकेशन पूर्ण होताच पुन्हा सवलतीच्या दरात सिलिंडर मिळण्यास सुरुवात होईल.