लव हॉस्टल, बॉबी देओलच्या चित्रपटाला शेतकरी आंदोलनाचा फटका


स्थैर्य,मुंबई, दि.६:  केंद्र सरकारने पास केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाचा फटका पंजाबमधील चित्रपटाच्या शूटिंगला बसत आहे. नुकताच एक बातमी आली आहे, पंजाबमध्ये आपल्या ‘लव हॉस्टल’ चित्रपटाचे बॉबी देओल शूटिंग करत होता. याची माहिती शेतकरी आंदोलकांना लागली आणि शेतकऱ्यांनी आपला मोर्चा चित्रपटाच्या सेटकडे वळवला त्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत देशात लावण्यात आलेले नवे कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही चित्रपटाचे शूटिंग पंजाबमध्ये होऊ देणार नाहीत.

या चित्रपटाच्या सेटवर बॉबी देओलला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. इतकेच नाही तर बॉबी देओल समोर शेतकरी म्हणाले की, तुमचा भाऊ सनी देओल एक अभिनेता तसेच पंजाबमधील गुरदासपूर येथील भाजपचा खासदार देखील आहे. मात्र, तेही आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत नाहीत. शेतकरी आंदोलकांनी पंजाबमधील चित्रपटाचे शूटिंग थांबवण्याची ही पहिली वेळ नसून या अगोदरही जान्हवी कपूरच्या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते.

बॉबी देओल स्टारर चित्रपट लव हॉस्टलमध्ये विक्रांत मस्से आणि सान्या मल्होत्रा ​​देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर रमण करत आहेत. त्याचबरोबर शाहरुख खानची प्रॉडक्शन कंपनी देखील या चित्रपटाची सह-निर्माता आहे. बॉबी देओलची ‘आश्रम’ वेब सीरीजला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले आहे. या वेब सीरीजमध्ये बॉबीचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे.


Back to top button
Don`t copy text!