भंडाऱ्यात रस्ते आणि नालीच्या कामावरुन काँग्रेस – राष्ट्रवादीचे नगरसेवक आमनेसामने


स्थैर्य,भंडारा, दि. ६:  रस्ते आणि नालीच्या कामावरून प्रभाग क्र. 8 मधील दोन नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. नगरसेवक उमेश ठाकरे आणि नगरसेविका जयश्री बोरकर याचे पती रवी बोरकर यांच्यातील भांडण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. वादानंतर रस्त्याचे काम रोखण्यासाठी गेलेली नगरसेविका आणि बांधकाम कामगार यांच्यातही धक्काबुक्की झाली.

भंडारा शहरातील म्हाडा परिसरातील नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 8 मध्ये रस्ते निधीअंतर्गत नाली आणि रस्त्याचे काम सुरु आहे. बांधकाम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराचे कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी आणि त्या प्रभागातील नगरसेवक उमेश ठाकरे हे प्रभागात पोहोचले. त्याच दरम्यान याच प्रभागातील आणि याच भागात राहणाऱ्या महिला काँग्रेस अध्यक्षा व नगरसेविका जयश्री बोरकर आणि त्यांचे पती हे ही तेथे पोहोचले. रस्त्याच्या कामावरुन दोन नगरसेवकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

काय आहे प्रकरण?

नालीचे काम सुरू करण्याअगोदर रस्त्यापासून मोजणी करून नंतरच नालीचे बांधकाम करा. तसेच, ह्या कंत्राटदाराची जुनी कामे पूर्ण झाल्यानंतरच या कामाला सुरुवात करा, असे सांगत नगरसेविका जयश्री बोरकर आणि त्यांचे पती रवी बोरकर यांनी काम थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरुवातीला नगरसेवक उमेश ठाकरे आणि नगरसेविकेचे पती रवी बोरकर यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, नगरसेवक उमेश ठाकरे आणि नगरसेविकेचे पती रवी बोरकर यांनी एकमेकांची लायकीही काढली. तरीही काम सुरुच ठेवल्याने कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांशी रवी बोरकर आणि त्यांचा भाऊ धर्मेंद्र बोरकर यांनी भांडण सुरु केले. कामगारांसोबत झालेल्या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!