भगवान महावीर यांची जयंती फलटण शहरात विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी; ‘संगिनी फोरम’कडून पाणपोईचे लोकार्पण


दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२४ | फलटण |
संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती फलटण शहरात जैन बांधवांनी मोठ्या उत्साहात व विविध विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी केली.

भगवान महावीर जयंती ही जैन समुदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. हा दिवस जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. भगवान महावीर शुक्ल पक्षामध्ये चैत्र महिन्याच्या तेराव्या दिवशी जन्मले होते. जैन लोक आनंद आणि उत्साहात हा दिवस साजरा करतात. श्रावक/श्राविका जैन मंदिरामध्ये जावून समुदायासाठी भगवान महावीर यांनी केलेल्या योगदानाचे स्मरण करतात आणि त्यांची शिकवण नव्या पिढीला शिकवतात.

या पार्श्वभूमीवर रविवार, दि. २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर पालखीमध्ये महावीर यांची प्रतिमा ठेवून श्री आदिनाथ मंदिर, शुक्रवार पेठ येथून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. ही शोभायात्रा शंकर मार्केट, टोपी चौक, पाच बत्ती चौक, बारामती चौक येथून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून भगवान महावीर स्तंभ, डेक्कन चौक, मारवाड पेठेतून पुन्हा श्री आदिनाथ मंदिर येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शोभा यात्रेमध्ये प्रामुख्याने बँण्ड पथक, जैन बांधवांनी बसविलेले मुला-मुलींची भव्य झांजपथक इ. वाद्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. या शोभायात्रेमध्ये नुकतेच महानिर्वाण प्राप्त झालेले आचार्य विद्यासागर महाराज यांना विनयांजली वाहण्यात आली. फलटण स्थित भगवान महावीर स्तंभास आकर्षक सजावट करण्यात आली होती.

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त जैन सोशल ग्रुपचे अध्यक्षा सौ. सविता दोशी, सेक्रेटरी श्री. प्रीतम वडूजकर व खजिनदार समीर शहा यांनी सहस्रकोट धर्मशाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये तब्बल ७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मिरवणुकीदरम्यान महावीर स्तंभ येथे जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना सरबताचे वाटप करण्यात आले. तसेच जनावरांना चारा वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, सेक्रेटरी सौ. प्रज्ञा दोशी, खजिनदार मनीषा घडीया, सौ. नीना कोठारी व त्यांच्या सर्व सहकार्‍यांच्या वतीने उमाजी नाईक चौक येथे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ज्येष्ठ व्यापारी कांतीलाल कोठारी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेशशेठ दोशी, पत्रकार विशाल शहा, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष शिवलाल गावडे (सर), जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सविता दोशी, संगिनी फोरमच्या संस्थापक अध्यक्षा सौ. स्मिता शहा, राजेंद्र कोठारी, श्रीपाल जैन, प्रीतम शहा, सचिन शहा यांच्यासह सर्व संगिनी पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.

दुपारी फलटण येथील आदिनाथ मंदिर, मारवाड पेठ येथील चंद्रप्रभू मंदिर येथे भगवान महावीरच्या जन्मकल्याणक निमित्त पाळण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्रावक/श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!