लोणंद पोलिसांनी २४ तासाच्या आत बकरी चोरी करणार्‍या टोळीच्या आवळल्या मुसक्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १५ एप्रिल २०२४ | फलटण |
अंदोरी (ता. खंडाळा) गावातून तीन बकरींची चोरी करणार्‍या टोळीच्या मुसक्या लोणंद पोलिसांनी २४ तासाच्या आत आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह एकूण पाचजणांना ताब्यात घेऊन तिघांना अटक केली आहे.

ओंकार अशोक खुंटे (वय २१, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा), करण विनोद खुंटे (वय २१, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा), सूरज उर्फ चिंग्या संतोष खुंटे (वय २३, रा. अंदोरी, ता. खंडाळा) व दोन विधीसंघर्ष बालक अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंदोरी (ता. खंडाळा) गावातून रू. ४५ हजार किमतीची तीन बकर्‍या चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी लोणंद पोलीस ठाण्याला तपासाच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि सुशील भोसले व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी या गुन्ह्यातील गोपनीय खबर्‍यामार्फत माहिती मिळवून आरोपी निष्पन्न केले.

दि. १४ एप्रिल २०२४ रोजी यातील आरोपी हे अंदोरी गावामध्ये फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशील भोसले व गुन्हे प्रकटीकरण पथकाने यातील तीन आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या स्वीफ्ट कारसह ताब्यात घेतले. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी व त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी मिळून अंदोरी गावच्या हद्दीतील खुरी नावाच्या शिवारातून तीन बकरी चोरी केल्याची कबुली दिली असून आरोपींनी चोरी केलेली बकरी व चोरी करतेवेळी गुन्ह्यात वापरलेले वाहन अशी एकूण ५,४५,००० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशील भोसले, गुन्हे प्रकटीकरणचे पो.ह. संतोष नाळे, विठ्ठल काळे, सर्जेराव सूळ तसेच पो.ह. नाना भिसे, पो.ह. अविनाश नलवडे यांनी केली असून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!