
स्थैर्य, लोणंद, दि. 13 जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री मकरंद पाटील यांनी लोणंद येथील पालखी तळावर प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा सविस्तर आढावा घेतला. पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या श्रद्धेचा विषय असून कोणत्याही वारकरी किंवा भाविकाची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
प्रशासनाला समन्वयाच्या सूचना
यंदा १५ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंदमध्ये मुक्कामी येणार आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, असे यावेळी ते म्हणाले. या पाहणी दरम्यान प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सुहास थोरात यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सुविधा आणि सुरक्षेवर भर
पालखीतळ, विसावा स्थळे, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि वाहतूक नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नीरा दत्त घाटावरील स्नान सोहळ्यासाठी अतिरिक्त बॅरिकेट्स उभारणे, सर्पमित्रांची नियुक्ती करणे आणि गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वारकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात सुलभ शौचालये, पिण्याच्या पाण्याचे टँकर तसेच अखंडित वीज उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. अन्नपदार्थ विक्रेत्यांच्या अन्नाची गुणवत्ता तपासण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
रस्त्यांची दुरुस्ती व वाहतूक नियोजन
पालखी मार्गावरील तसेच पुणे-सातारा महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश पाटील यांनी दिले. वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विविध ठिकाणी एसटी बससाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोहळा सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
