कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना अक्षरबाग द्वारे विद्यार्थ्यांना अक्षर ओळख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

अक्षरबाग प्रकल्पातील घराच्या अंगणातील वाफे

स्थैर्य, फलटण दि.५: जिल्हा परिषदेच्या प्रा. शाळेत दाखल झालेल्या इयत्ता १ ली मधील विद्यार्थ्यांना हसत खेळत, कुतुहलजन्य, औत्सुक्यपूर्ण वातावरणात अक्षर ओळख व्हावी यासाठी सातारा जिल्हा परिषद केंद्र शाळा निंबळक, ता. फलटण येथील उपक्रमशील शिक्षक रविंद्र जंगम यांनी अक्षर बाग हा अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यांचे ग्रामस्थ, सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांमधून कौतुक होत आहे.

इयत्ता १ ली तील चिमुकल्यांसाठी अनोखा प्रयोग

कोरोना वाढता प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत, विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसे पोहोचवायचे हा सर्वांसमोरचा प्रश्न, ऑनलाईन/ऑफलाईन वगैरे काही पर्यायही पुढे आले आहेत. यावर्षी इयत्ता १ ली मध्ये दाखल झालेली चिमुकली अद्याप शाळेची पायरी चढलेली नाहीत, त्यांना शाळा, वर्ग, शिक्षक, सहकारी विद्यार्थी याची कसलीही माहिती नाही.

लहानग्यांची शिक्षण प्रक्रिया संकटात

शाळा प्रवेशोत्सवाशिवाय त्यांच्या औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली आहे. शिक्षण आणि विद्यार्थी या मधला शिक्षक हा महत्वाचा दुवा, या छोट्या मुलांच्या समोर शिक्षक, मार्गदर्शक असतील तर शिक्षण प्रक्रिया सुलभ होते, परंतू सद्य कोरोना काळात ते शक्य नसल्याने या लहानग्यांची शिक्षण प्रक्रिया संकटात सापडली आहे.

तथापी मुलांचे शिक्षण सुरु राहिले पाहिजे, त्यामधील अक्षर ओळख हा महत्वाचा व पहिला टप्पा पार करुन मुले पुढे गेली पाहिजेत यासाठी विविध उपाययोजना बरोबर अक्षरबाग हा अनोखा उपक्रम निंबळक, ता. फलटण येथे उप शिक्षक रविंद्र जंगम यांनी अत्यंत प्रभावीरीतीने राबविला आहे.

अंगणात, घरात प्रसंगी डबा, प्लेट मध्ये प्रकल्प

या छोट्या विद्यार्थ्यांनी प्रसंगी पालकांच्या मदतीने आपल्या अंगणात, घराशेजारच्या मोकळ्या जागेत, गादी वाफा तयार करुन त्यावर अक्षर चाकोरी तयार केली, त्यामध्ये गहु, ज्वारी, बाजरी, मका असे उपलब्ध धान्य पेरले ज्यांना पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही त्यांनी द्रोण, प्लास्टिक डबे, प्लेट वगैरेचा वापर करुन त्यावर धान्य पेरले आहे.

दिवसागणिक वाढत जाणारी ही छोटी बाग विद्यार्थ्यांना अक्षर ओळख देऊन जात आहे. मुलेही वाढत जाणाऱ्या उगवत्या अक्षरांकडे कौतुक भरल्या नजरेने पहात वाचनाचे धडे गिरवीत आहेत.

या छोट्या मुलांमधील नवे जाणून घेण्याची उर्मी जपत, हसत खेळत सहज शिक्षणासाठी आमचा अक्षरबाग उपक्रम फलदायी ठरत असल्याचे रविंद्र जंगम यांनी सांगितले आहे.

निंबळक, ता. फलटण येथील प्रा. शाळेतील या नाविन्यपूर्ण, अनोख्या उपक्रमाचे उद्योजक राम निंबाळकर, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, सरपंच सौ. लक्ष्मीताई कापसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास भोईटे व सर्व समिती सदस्य, प्रभारी गट शिक्षणाधिकारी रमेश गंबरे, शिक्षण विस्तार अधिकारी चनय्या मठपती, केंद्र प्रमुख दारासिंग निकाळजे, सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!